Navi Mumbai Traffic: नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी (Vashi) परिसरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, या समस्येसाठी थेट वाशी आणि कोपरखैरणे वाहतूक शाखांना जबाबदार धरले जात आहे. बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे आणि वाहतूक पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे वाशी परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
शॉपिंग हबमध्ये वाहतूक 'जाम'
वाशी विभाग हा नवी मुंबईचा प्रमुख आणि सर्वात जास्त वर्दळीचा भाग आहे. वाशी प्लाझा, शिवाजी महाराज चौक (Shivaji Maharaj Chowk), सेक्टर 9, 10, 11 परिसर आणि ब्लु डायमंड चौकापर्यंतचा (Blue Diamond Chowk) भाग खरेदीचे मोठे केंद्र (Shopping Hub) म्हणून ओळखला जातो. मात्र, याच भागात वर्षभर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या कायम आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळच्या वेळी केवळ 500 मीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागतो.
बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणामुळे वाहतूक ठप्प
जैन मंदिर (Jain Mandir) ते जुहूगाव (Juhugaon) या रस्त्यावर बेशिस्त वाहने, दुहेरी पार्किंग (Double Parking), पदपथांवर (Footpaths) फेरीवाल्यांचे (Hawkers) अतिक्रमण आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे वाहनचालकांचा संयम सुटत आहे. यावर पालिका (NMMC) केवळ थातुरमातूर कारवाई करते, तर वाशी वाहतूक शाखा (Vashi Traffic Police) मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सिग्नलवर हेल्मेट किंवा सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर दंड (Fine) आकारला जातो, पण वाहतुकीचे मोठे नियम मोडणाऱ्यांना मोकळीक दिली जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
( नक्की वाचा : Pune News : जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांचा नवा बॉम्ब, PM मोदींना पत्र लिहून दिले 'हे' थेट आव्हान! )
'हप्त्या'चा आरोप आणि कारवाईत दुर्लक्ष
वाशी-पनवेल हायवे (Vashi-Panvel Highway) पुलाखालीच वाहतूक शाखेचे कार्यालय असून, याच कार्यालयाच्या बाहेर खासगी (Private) आणि राज्य परिवहन बसचालकांनी (ST Bus) बसथांब्यावर अतिक्रमण करून वाहतूक ठप्प केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, 'महिन्याचा हफ्ता' (Monthly Bribe) पोहोचत असल्यामुळे या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नाही, असा थेट आणि गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
याव्यतिरिक्त, ब्लु डायमंड चौकाजवळील भगत ताराचंद (Bhagat Tarachand) आणि मधुबन फास्ट फूड (Madhuban Fast Food) येथे येणारे ग्राहक मनमानीपणे रस्त्यावर वाहने उभी करतात, ज्यामुळे सिग्नलपासून पुढच्या चौकापर्यंत वाहतूक थांबते. 'सेटिंग'मुळे (Setting) त्यांच्यावरही कारवाई होत नसल्याचे नागरिक सांगतात.
नागरिकांची मागणी काय?
वाशीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था (Parking Facility) उपलब्ध असूनही, चालकांना फुकटात रस्त्यावरच वाहने उभी करण्याची सवय लागली आहे. "पोलीस (मामा) आला तरी 50 ते 100 रुपये देऊन 'मांडवली' करायची" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे. वाहतूक शिस्त आणि नियंत्रणाचे संपूर्ण अपयश वाशी आणि कोपरखैरणे वाहतूक शाखांवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे "हे दोन्ही विभाग बंद करून नव्याने जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी," अशी संतप्त मागणी नवी मुंबईतील नागरिकांकडून जोर धरत आहे.
स्थानिक सामाजिक संघटनांनी (Social Organizations) या विषयावर तीव्र भूमिका घेतली असून, त्यांनी लवकरच नवी मुंबई वाहतूक विभाग (Navi Mumbai Traffic Department) आणि नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) यांच्याविरोधात आंदोलन (Agitation) छेडण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईत वाढती वाहतूक, वाहनांची वाढती संख्या आणि प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश—यामुळे शहर अक्षरशः गुदमरत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.