NDTV Exclusive: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आल्याने दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेला उधाण आले होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहेत.
यामुळे राज्यात पुन्हा एकदा 'एकच राष्ट्रवादी' पाहायला मिळणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, 'NDTV BMC Power Play' या कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण किंवा एकत्र येणे आता शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
देवेंद्र फडणवीसांची गुगली आणि पटेलांचे उत्तर
NDTV च्या कार्यक्रमादरम्यान जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी समोरच बसलेल्या प्रफुल्ल पटेलांकडे बोट दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा माणूस तुमच्या समोरच बसला आहे. जे दोन्ही बाजूने बोलू शकतात, असे प्रफुल्ल पटेलच याबाबत अधिक स्पष्ट सांगू शकतील," असे फडणवीस मिश्किलपणे म्हणाले.
(NDTV BMC Power Play: मुंबईमध्ये महायुती किती जागा जिंकणार? पियुष गोयल यांनी मोठा आकडा सांगितला)
प्रफुल्ल पटेलांचे स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीसांच्या विधानानंतर पटेल यांनी थेट भूमिका मांडली. "मी यापूर्वीच सांगितले आहे की, हे शक्य नाही. तरीही तुम्ही हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहात. दोन्ही राष्ट्रवादी आता पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
(NDTV BMC Powerplay LIVE Updates: उद्धव ठाकरेंनी नवीन स्क्रिप्ट रायटर ठेवावा: CM देवेंद्र फडणवीस)
प्रफुल्ल पटेल यांनी केवळ एकत्र येण्यास नकार दिला नाही, तर त्यांची भविष्यातील राजकीय दिशाही स्पष्ट केली. केंद्रात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहू. तर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढवू, असं प्रफल पटेल यांनी स्पष्ट केलं.