जाहिरात

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीत पुण्याचा 'गॉड' अटकेत! मनिषा हवालदारसोबत नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर

NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली असून या प्रकरणातील एका अनाकलनीय कोड्याचा अखेर उलगडा झाला आहे.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीत पुण्याचा 'गॉड' अटकेत! मनिषा हवालदारसोबत नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर
NEET Paper Leak : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'गॉड' नावाचा व्यक्ती आता सीबीआयच्या जाळ्यात अडकला आहे.
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली असून या प्रकरणातील एका अनाकलनीय कोड्याचा अखेर उलगडा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'गॉड' नावाचा व्यक्ती आता सीबीआयच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईनंतर आता अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या 13 वर पोहोचली आहे.

मनिषा हवालदारचा 'गॉड' अखेर जेरबंद

नीट तपासादरम्यान सीबीआयच्या हाती मनिषा हवालदारचा मोबाईल लागला होता. या मोबाईलमध्ये 'गॉड' या नावाने एक मोबाईल नंबर सेव्ह होता. हा 'गॉड' नेमका कोण? असा प्रश्न तपास यंत्रणांना सतावत होता. अखेर सीबीआयने या नावामागचा चेहरा शोधून काढला आहे.

Latest and Breaking News on NDTV

पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये फिजिक्सचा शिक्षक असलेला तेजस हर्षदकुमार शाह हाच तो 'गॉड' असल्याचं तपासात समोर आलं आहे. तेजस शाहाने मनिषा हवालदारकडून फिजिक्सचे पेपर मिळवले होते, अशी माहिती आता उघड झाली आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंग डिलीट; पुरावे मिटवण्यासाठी मनिषा हवालदारने वापरली 'ही' शक्कल )

लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरेही सीबीआयच्या ताब्यात

तेजस शाहसोबतच लातूरमधील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचा डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयने अटक केली आहे. मनोज शिरुरे हा या संपूर्ण रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. त्याने केमिस्ट्रीचे लीक झालेले प्रश्न मिळवून ते तीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात मध्यस्थी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शिरुरेच्या रुग्णालयात साडेचार तास चाललेल्या चौकशीनंतर सीबीआयने काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )

अशी होती पेपरफुटीची 'मोड्स ऑपरेंडी'

नीट पेपरफुटीचा हा संपूर्ण कट शिवराज मोटेगावकरने अतिशय सुनियोजितपणे आखल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटने थेट 'NTA'च्या (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) पॅनलपर्यंत मजल मारली होती.

  • मोटेगावकरने पी.व्ही. कुलकर्णी आणि मनिषा मांढरे यांची वर्णी एनटीएमध्ये प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर लावून घेतली होती.
  • कुलकर्णी यांनी केमिस्ट्री आणि मांढरे यांनी बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न चक्क तोंडपाठ केले.
  • एनटीएच्या ऑफिसमध्ये बसून प्रश्न पाठ केल्यानंतर ते बाहेर येऊन कागदावर लिहून काढले जायचे आणि त्यानंतर त्याचे पीडीएफ बनवून मोटेगावकरला पाठवले जात होते.
  • हे प्रश्न नंतर लाखो रुपयांच्या बदल्यात गरजू विद्यार्थ्यांना विकले गेले.

शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, तीन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मिळाले होते. यातील एक विद्यार्थी लातूरमधील एका क्लास संचालकाचा मुलगा असून, त्याने दिलेल्या माहितीमुळेच या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पुण्याचा प्राध्यापक, लातूरचा डॉक्टर आणि एनटीए पॅनलचे सदस्य अशा हाय-प्रोफाईल लोकांचा सहभाग पाहता, ही साखळी किती खोलवर पसरली आहे, या विचाराने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com