आज सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणी सुनावणी (Supreme Court in NEET case) पार पडणार आहे. 40 पेक्षा जास्त याचिकांवर अंतिम निर्णयाची अपेक्षा याचिकाकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. नीट-यूजी परीक्षेतील (NEET-UG Exam) अनियमितता आणि ती रद्द करण्याच्या मागणीशी संबंधित विविध याचिकांवर आज सुनावणी होईल. गेल्या काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
नीट-यूजी परीक्षेतील अनियमितता आणि ती रद्द करण्याच्या मागणीशी संबंधित विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठात ही सुनावणी होईल. या खंडपीठात न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे. दरम्यान 40 पेक्षा जास्त याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नीटसंदर्भात याचिकांवर आज सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर सुनावणी होईल. समुपदेशन तोंडावर आले असल्यानं याचिकांवर न्यायालय अंतिम निकाल काय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नीट-यूजी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असं वाटत असेल तर व्यापक प्रमाणात प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध करा अशी विचारणा सरन्यायाधीशांनी गेल्यावेळी याचिकाकर्त्यांना केली होती.
नक्की वाचा - Vidarbha Rain : भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
खंडपीठाने नीट पेपर लीक प्रकरणाची चौकशी करणाऱ्या बिहार पोलीस आणि त्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवालाची प्रत मागितली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की, ते स्वतः दोन्ही अहवाल न्यायालयासमोर मांडतील. पाटणा पोलिसांनी नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याचा खुलासा परीक्षेच्या दिवशीच 5 मे रोजी केला होता. याप्रकरणी शहरातील शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर हे प्रकरण बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
23 जून रोजी केंद्र सरकारने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली होती. या प्रकरणाची सुनावणी 22 जुलैपर्यंत पुढे ढकलताना सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) परीक्षा केंद्रनिहाय निकाल वेबसाइटवर प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते.