पुण्यातील मुंढवाजवळील एका पबमध्ये थर्टी फस्टच्या पार्टीसाठी येणाऱ्यांना एक कंडोम आणि ओआरएसचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती होती. ही बाब सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली होती. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांना या दोन वस्तू भेट म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान NDTV मराठीने या गोष्टीचा पाठपुरावा केला. अखेर पुणे पोलिसांनी याची दखल घेतली असून या पबला नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीनंतर मुंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सोमवारी होणारा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पबने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा आशयाची नोटीस पोलिसांनी पबला पाठवली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे रविवारी या पबविरोधात तक्रार केली होती.
नक्की वाचा - New Year Celebration : नववर्षाच्या पार्टीमध्ये पबकडून कंडोम आणि ORS चं पाकिट भेट, पुण्यातील 'त्या' पबचा अजब दावा
काय आहे प्रकार?
नववर्षानिमित्त सध्या पब आणि रेस्टॉरंटमध्ये विविध थीमअंतर्गत पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील मुंढवाजवळील हाय स्पिरीट नावाच्या पबमध्ये निमंत्रितांसाठी कंडोम आणि ओआरएसचं पाकीट देण्यात येणार होतं. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचं पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला होता. मात्र पुणे पोलिसांनी पबला नोटीस पाठवली आहे.