जाहिरात

'तुझ्यावर सर्वात आधी कारवाई झाली पाहिजे!', मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला गडकरींचा सज्जड दम; नेमकं काय घडलं?

Road Safety Rules Gadkari : नागपूरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला.

'तुझ्यावर सर्वात आधी कारवाई झाली पाहिजे!', मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला गडकरींचा सज्जड दम; नेमकं काय घडलं?
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमधील कार्यक्रमात बोलत होते.
नागपूर:

Road Safety Rules Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरलाच सर्वांसमोर दटावल्याचा एक रंजक आणि तितकाच डोळे उघडणारा किस्सा सांगितला आहे. सीट बेल्ट लावण्याबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी गडकरींनी दिलेल्या या कडक सूचना सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला गडकरींचा सज्जड दम

कारमध्ये सीट बेल्ट लावला नाही की 'बीप बीप' असा सतत आवाज येतो. हा आवाज येऊ नये म्हणून अनेक ड्रायव्हर सीट बेल्टच्या सॉकेटमध्ये एक विशेष क्लिप लावतात. असाच प्रकार मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा  ड्रायव्हर देखील करत असल्याचे गडकरींच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांसमोरच त्या ड्रायव्हरला थांबवले आणि सुनावले. तुझ्यावर सर्वात आधी कारवाई झाली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे नियमांची पायमल्ली करणे जिवावर बेतू शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

गडकरींनी यावेळी हे मुख्यमंत्री कोण हे सांगितले नाही. पण, त्यानंतर त्यांनी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला झापलं याची चर्चा सुरु झाली आहे.

( नक्की वाचा : IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर )

अ‍ॅमेझॉनवरील त्या क्लिपवर पोलिसांत तक्रार

सीट बेल्टचा आवाज बंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लिप अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स साईट्सवर सहज उपलब्ध होतात. नितीन गडकरींनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या क्लिप विकणाऱ्यांविरोधात आपण पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. सुशिक्षित लोकच सर्वात जास्त वाहतुकीचे नियम तोडतात, ही चिंतेची बाब असून त्यांना नियमांचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

नगरसेवकांना आवाहन

वाहतूक नियमांसोबतच गडकरींनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही कामाला लावले आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील अपघातप्रवण क्षेत्रांची (Black Spots) पाहणी करावी आणि तिथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. आपल्या प्रभागात अपघातात एकाचाही जीव जाणार नाही, असा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले आहे. महापालिकेने अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Traffic Jam : सोलापूर-धुळे महामार्गावर 40 किलोमीटरचा ऐतिहासिक ट्रॅफिक जाम,15 लाखांची गर्दी रस्त्यावर, VIDEO )

नागपूरमध्ये 5000 झाडे लावणार

वृक्षारोपण आणि अपघात निवारण हे दोन कार्यक्रम हातात घेण्याचे आवाहन गडकरींनी केले. यावर्षी नागपूर शहरात 3 फूट उंचीची तब्बल 5000 झाडे लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नगरसेवकांनी केवळ रस्ते बांधणीवर लक्ष न देता पर्यावरण आणि रस्ते सुरक्षा या विषयांतही पुढाकार घ्यावा, असे गडकरींनी यावेळी आवर्जून सांगितले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com