Nagpur News: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा आणि केंद्र सरकारच्या इथेनॉल (E20) धोरणाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली बिहारचा प्रसिद्ध युट्युबर मनीष कश्यप याच्यासह चार जणांविरुद्ध नागपुरात अधिकृत FIR दाखल करण्यात आला आहे.
नागपूर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मनीष कश्यप, देसी बॉईज एनसीआर, हषित राठी आणि अंकलेश इनवाटे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश असून त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सची चौकशी सुरू झाली आहे.
नेमका आरोप काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही इन्फ्लुएन्सर्सनी युट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही वादग्रस्त आणि कथित भ्रामक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओंमध्ये देशातील इथेनॉल (E20) इंधनाच्या वापरात मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि बोगस व्यवहार होत असल्याचा दावा करण्यात आला होता.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
इतकेच नव्हे तर, केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणाच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचं या व्हिडिओंमधून करण्यात आला होता. यामध्ये कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय किंवा आधारशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव ओढून त्यांची धोरणे चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात आली, जेणेकरून त्यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मलिन करता येईल, असा आरोपा या इन्फ्लुएन्सर्सवर आहे.
भाजप सोशल मीडिया सेलची तक्रार
हा प्रकार जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित पद्धतीने राबवलेली एक बदनामीची मोहीम असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष शिशिर त्रिपाठी यांनी सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आपल्या व्हिडिओंना खरे रूप देण्यासाठी या इन्फ्लुएन्सर्सनी सामान्य नागरिकांच्या खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या मुलाखतींचा वापर केला होता. निव्वळ व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या हव्यासापोटी एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न या चारही आरोपींनी केला आहे.
(नक्की वाचा- Ranbir Kapoor Investment: रणबीर कपूर बनला पुणेकर! मुळशीतील 'या' गावात खरेदी केली तब्बल 25 एकर जमीन)
तपासात दावे ठरले खोटे आणि तथ्यहीन
सायबर सेलच्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी पसरवलेली माहिती पूर्णपणे तथ्यहीन आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणांशी किंवा घटनांशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लांबलांबपर्यंत कोणताही संबंध नाही. यामागे काही मोठा राजकीय कट किंवा इतर कोणाचा हात आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world