यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune LPG Gas Shortage News : अमेरिका, इस्त्रायल-इराणच्या युद्धाचे चटके भारतालाही बसले आहेत. देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशातच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबतही विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही ठिकाणी घरगुती गॅसबाबत अफवाही पसरवल्याचं समोर आलं आहे. अशातच पुण्यातही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना मोठं आवाहन केलं आहे.
"पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये",असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद, महिला बचत गटही चिंतेत, घडलंय तरी काय?
जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर देखरेख
जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय फिरती व दक्षता पथके गठित करण्यात आली आहेत. कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे,जादा दराने विक्री करणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणच्या 'या' भागात बांधली 8 मजली अनधिकृत इमारत, 65 बेकायदा इमारतींचं प्रकरण अन् बरंच काही..
तसेच हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवांना तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा,अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world