योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News Today : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आस्टूल ग्रामपंचायतीत आयोजित विशेष ग्रामसभेत मोठा वाद निर्माण झाला आहे. या ग्रामसभेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामसभेसारख्या घटनात्मक कार्यक्रमात बाबासाहेबांचा फोटो नसणे ही गंभीर बाब असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे,या ग्रामसभेत कोणत्याही महापुरुषांचा फोटो नसल्याचा दावा करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसच सम्राट अशोक सेनेचे संस्थापक आकाश शिरसाट यांचा मंत्री गिरीश महाजन यांनाही इशारा दिला आहे.
सम्राट अशोक सेनेचा आरोप अन् आक्रमक पवित्रा
याप्रकरणी सम्राट अशोक सेना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिरसाट यांनी ग्रामसेवकावर थेट जातीवादी मानसिकतेचा आरोप केला आहे.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या प्रतिमेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.यापूर्वी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने तसेच अमरावतीत फोटो न लावल्याने वाद निर्माण झाले होते, त्याच पार्श्वभूमीवर आस्टूलमधील घटना अधिक संवेदनशील ठरत आहे.
नक्की वाचा >> अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली
कारवाईची मागणी,आंदोलनाचा इशारा
दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधित ग्रामसेवकाची हकालपट्टी करण्यात यावी, अशी ठाम मागणी सम्राट अशोक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण अकोला जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादामुळे जिल्ह्यातील वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर राजकीय व सामाजिक संघटनांचं लक्ष लागलं आहे.