बदलापूरच्या 'त्या' शाळेच्या संचालक मंडळात भाजपसह शिवसेना आणि ठाकरे गटाचेही नेते

बदलापूरमधील शाळेच्या संस्थेच्या सध्याच्या संचालकांच्या यादीत भाजप सोबतच शिवसेना आणि उबाठा गट यांचेही नेते असल्याचं समोर आलं आहे. ट्रस्टच्या एकूण सदस्यांपैकी 5 सदस्य हे या दोन्ही गटांशी संबंधित आहेत, तर दोन स्वतंत्र आणि शिक्षक सदस्य आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins

निनाद करमकर, बदलापूर

बदलापूरच्या एका नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राजकारण तापलं आहे. या शाळेच्या संस्थेचे संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर शिक्षणसंस्थेत राजकारण न आणण्याचं आवाहन भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी केला होता. 

मात्र या सगळ्यात आता नवीन ट्विस्ट आला आहे. कारण संचालक मंडळात फक्त भाजपाचेच नव्हे, तर शिवसेना आणि उबाठाचेही लोक असल्याची माहिती बदलापूरचे भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे. तसेच विरोधकांकडून मात्र भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या संस्थेच्या सध्याच्या संचालकांच्या यादीत भाजप सोबतच शिवसेना आणि उबाठा गट यांचेही नेते असल्याचं समोर आलं आहे. ट्रस्टच्या एकूण सदस्यांपैकी 5 सदस्य हे या दोन्ही गटांशी संबंधित आहेत, तर दोन स्वतंत्र आणि शिक्षक सदस्य आहेत.

(नक्की वाचा-  केंद्र सरकारची 'युनिफाइड पेन्शन स्कीम'ला मंजुरी, 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा)

कोण आहेत संचालक मंडळाचे सदस्य?

  • उदय कोतवाल - अध्यक्ष, (20 वर्षे अध्यक्ष आणि पदाधिकारी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • तुषार आपटे - सचिव, (20 वर्षे सचिव) - अपक्ष
  • जनार्दन घोरपडे - उपाध्यक्ष (40 वर्षांपासून सदस्य, त्यापैकी अनेक वर्षे अध्यक्ष) - शिवसेना
  • विवेक मुळे - सहसचिव, शिक्षक सदस्य
  • राम शेटे - खजिनदार (5 वर्षे खजिनदार) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • उदय केळकर - सदस्य, (20 वर्षांपासून सदस्य) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • मनोहर आंबवणे - सदस्य (30 वर्षांपासून पदाधिकारी, सध्या सदस्य) - उबाठा गट, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख
  • नंदकिशोर (राम) पातकर - सदस्य (7 वर्षांपासून सदस्य) - भाजपा
  • संजय गायकवाड - सदस्य (15 वर्षांपासून सदस्य) - शिवसेना
  • हरिश्चंद्र भोईर - सदस्य (2 वर्षांपासून सदस्य) - उबाठा गट
  • अशोक घोरपडे - सदस्य (2 महिन्यांपूर्वी पूर्वी सदस्य झाले) - उबाठा गट

विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही राजेंद्र घोरपडे यांनी केला आहे. तसेच आपल्याला त्या चिमुकल्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा असून शाळा सुद्धा पुन्हा सुरू करायची आहे. त्यामुळे यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावं, असं आवाहन सुद्धा राजेंद्र घोरपडे यांनी केलं आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंच्या वाढत्या लोकप्रियतेची काँग्रेसला धास्ती, महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?)

आता ही माहिती समोर आल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून आरोप करणारे विरोधक काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून शाळेवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. तर शाळा प्रशासनाने ही माहिती वेळीच पोलिसांना न दिल्यानं संस्थेच्या विरोधातही पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर बहुतांशी संचालक फरार झाले आहेत.