राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असून राज्य अक्षरश: होरपळत आहे. नागरिकांच्या अंगाची काहिली होत असताना वन्यप्राण्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान वर्ध्यातून वनविभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. या पाणवठ्यांमध्ये पाणीच नाही. उलटपक्षी पाणवठे मातीने गच्च भरलेले आहे. जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावाच्या दिशेने येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे वाशिममधील एका जागृत पर्यावरणप्रेमी आदित्य इंगोले याने रखरखत्या उन्हात स्वत: कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती केली आहे.
वर्ध्यात वनविभागाचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला असून वन्यप्राण्यांची तहान भागविणारे पाणवठे वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे कोरडे व नादुरुस्त परिस्थितीत पडून आहेत. वर्ध्याच्या तळेगाव वनपरिक्षेत्रात ही गंभीर बाब उघड झाली असून जंगलात प्राण्यांची तहान भागवण्यासाठी बनविलेल्या पाणवठ्यात माती भरलेली असून ते पूर्णतः दिसेनासे झाले आहेत. या शिवाय त्या पाणवठ्यात पाणी टाकण्यासाठी असलेला हँडपम्प देखील तुटलेल्या स्थितीत असून जंगलात पिण्यासाठी पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी हायवेवर व गावांच्या शेजारी येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या व वन्यप्राण्यांच्या दोघांच्याही जीवितेला धोका निर्माण झालेला आहे.
नक्की वाचा - छत्रपती संभाजीनगरात सुरू होतं विहिरीचं खोदकाम, महसूल विभागाने का थांबवलं? चर्चेला उधाण
वनविभागाकडून दुर्लक्ष केलं जात असताना एका पर्यावरणप्रेमीच कौतुक केलं जातं आहे. वाशिम जिल्ह्यात तापमान 43 अंशांच्यावर पोहोचले आहे. या तापमानात जंगलातील वन्यप्राण्यांची घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यात जंगलात पुरेसे पाणी नसल्यानं वन अधिकारी आणि वन्यजीवरक्षक यांच्या पुढाकारातून मुक्याजीवांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणप्रेमी आदित्य इंगोले हा रखरखत्या उन्हातही कृत्रिम पाणवठे तयार करीत असल्याचं चित्र वाशिमच्या वनोजा येथील प्रादेशिक जंगलात पाहायला मिळालं. त्यामुळं आता मुक्या प्राण्यांची तहान भागणार आहे.