छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरातील शेतीमध्ये विहिरीचे खोदकाम करीत असताना आकर्षक चकाकणारे दगड आढळून आले आहेत. यामुळे गावात एकच चर्चा सुरू झाली आहे. रविंद्र शिवाजी शिंदे यांच्या शेतात विहिरीचं काम सुरू असताना अचानक चमकणारे दगड आढळून आले.
साधारण पन्नास फुटांपर्यंत खोदकाम झाल्यानंतर खोदकामामध्ये पिवळसर बदामी रंग असलेले पाणीदार दगड आढळून आले. परंतु संबंधित शेतकऱ्यास हा कोणत्या प्रकारचा दगड आहे, याची माहिती नसल्यामुळे त्यांनी ही घटना नजरेआड केली. परंतु परिसरात याची माहिती पसरताच मोठी गर्दी जमा झाली. याबाबत पोलिसांना कुणकुण लागली आणि पोलिसांनी थेट घटनास्थळी धाव घेऊन विहिरीचं काम बंद पाडलं. तसेच महसूल विभागाकडून पंचनामा करून विहीर सील करण्यात आली आहे.
हे चमकणारे दगड नेमकं कसले आहेत याबाबतची कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र शिवाजी शिंदे यांच्या शेतात विहिरीचं खोदकाम सुरू होतं. सुरुवातील खोदकामाचं काम व्यवस्थित सुरू होतं. मात्र साधारण 50 फूट खोदकाम झाल्यानंतर विहिरीतून काहीतरी वेगळं जाणवू लागलं. खोदकाम सुरू असताना जे दगड दिसले ते सर्वसाधारण दगडांपेक्षाही वेगळे होते. सुरुवातील मालकाने याकडे दुर्लक्ष केलं. मात्र हळूहळू ही बातमी गावभर पसरली. आणि ते दगड पाहण्यासाठी गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि खोदकाम थांबवून विहिरीचं काम सील केलं. महसूल विभाकाने विहिरीत सील केलं असून आढळलेले दगड मौल्यवान आहेत का, किंवा नेमकं कुठले आहेत याचा तपास घेतला जाईल त्यानंतरच खोदकामाला सुरुवात केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हे मौल्यवान दगड असून, याची बाजारात मोठी किंमत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने हे दगड ताब्यात घेतले असून, नेमकं हे दगड कोणत्या प्रकारचे आहे याचा शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world