केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य (MEP) रद्द करण्याचा आणि निर्यात शुल्क निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट फायदा आता शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याचे भाव वाढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लासलगाव एपीएमसी ही देशातील सर्वात मोठी कांदा घाऊक बाजारपेठ आहे.
(नक्की वाचा - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर! केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय)
"किमान निर्यात मूल्य काढून टाकणे हा नक्कीच चांगला निर्णय आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. आम्हाला वाटते की निर्यात बंदी नसावी. अशा गोष्टी लादल्या गेल्याने आणि काढून टाकल्याने बाजारावर परिणाम होतो. आता एमईपी काढून टाकण्यात आला आहे, पण शेतकऱ्यांच्या कांद्याचे उत्पादन संपत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तितकासा फायदा होणार नाही, असं लासलगाव एपीएमसीचे चेअरमन बाळासाहेब क्षीरसागर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- पंढरपुरातील धनगर उपोषणकर्ते आणि दोन मंत्र्यांमधील चर्चा निष्फळ, उद्या CM एकनाथ शिंदेंसोबत बैठक)
एपीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी बाजारात 425 वाहने किंवा 5182 क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला 3700 ते 4951 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 4,700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले होते. तर शुक्रवारी सुमारे 302 वाहने किंवा 3,736 क्विंटल कांद्याची आवक झाली आणि किमान 2800 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल 4411 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 4267 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर होता.
सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के केले आहे. शुल्क कपात 14 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. 4 मे पासून 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे.