चोराने काय चोरावं याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय नाशिकच्या सटाण्यात आला आहे. इथे एक चोरी झाली आहे. पण ही चोरी पैसे, दागिन्यांची नाही. तर ही चोरी आहे चक्क कांद्यांची. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. नाशिकच्या सटाण्यात ही चोरी झाली आहे. शेतात काढून ठेवलेले एक दोन नाही तर तब्बल 45 क्विंटल कांदे चोरीला गेले आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देविदास कोर यांनी आपल्या काकांची शेती करण्यासाठी घेतली होती. पिकही चांगले आले होते. जवळपास 60 क्विंटल कांद्याचे उत्पन्न झाले होते. दोन ट्रॅक्टर कांदा त्यांनी विकला होता. तर बाकीचा कांदा काढून त्यांनी शेतातच ठेवला होता. पण या कांद्यावरच कोणीतरी डल्ला मारेल याची पुसटती कल्पनाही त्यांना नव्हती. शेतात त्यांचा जवळपास 40 ते 45 क्विंटल कांदा पडून होता.
हेही वाचा - कर्ज फेडण्यासाठी नातवाने उचलले टोकाचे पाऊल, 80 वर्षीय आजीविरोधात रचला गंभीर कट
पाऊसाचे वातावरण झाले होते. त्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी देविदास हे शेतात गेले. मात्र शेतात गेल्यानंतर त्यांना धक्का बसला. तब्बल 45 क्विंटल कांदा गायब होता. कांद्याला थोडा भाव येईल म्हणून त्यांनी तो साठवून ठेवला होता. मात्र त्यावर डल्ला मारला गेला. मालेगाव-नामपूर रस्त्यावरील निमदरा फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून अज्ञात चोरट्यानी हा कांदा चोरला.
हेही वाचा - मोदींच्या सभेत गोंधळ, कांद्यावरून वांदा होणार? शरद पवार थेट बोलले
देविदास कोर याने पाच एकरात कांद्याचे पीक घेतले होते. कांदा काढून शेतात विक्री करण्यासाठी तो साठवून ठेवला होता. मात्र अज्ञात चोरट्यानी याच कांद्यावर डल्ला मारला. देविदास कोर यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावाला गेला. त्यामुळे यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय त्यांचे बजेटही यामुळे कोलमडले आहे. त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न त्यांच्या ,समोर आहे. दरम्यान कांदा चोरीप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. कांदा चोरीमुळे आता शेतकऱ्यांना शेतातच कांद्याला पहारा देण्याची वेळ आली आहे.