पलावा पुलाचं कवित्व कल्याण डोंबिवलीकर गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आले आहेत. हा पूल वाहतुकीसाठी 4 जुलै रोजी खुला करण्यात आला. या पुलाने आतापर्यंत विविध रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. अर्थात या रेकॉर्डची नोंद अद्याप कोणी घेतली नसली तर कल्याण-डोंबिवलीकरांनी ती नक्की घेतली आहे. पहिला रेकॉर्ड होता तो म्हणजे पूल वाहतुकीसाठी खुला होताच काही क्षणात बंद करण्याचा. आता या पुलाने दुसरा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र या रेकॉर्डसाठी जबाबदार असलेला 'चाँदभाई' कोण असा सवाल विचारला जात आहे.
( नक्की वाचा: स्मार्ट मीटरने दिला वीज बील वाढीचा शॉक, भरमसाठ रकमेमुळे सर्वच हैराण )
राजू पाटील यांची पोस्ट काय आहे ?
4 जुलै रोजी वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या या पुलावर एका महिन्यात इतके खड्डे पडले आहेत की ते मोजणंही सोंडून दिलं आहे. यंत्रणांनी हे खड्डे बुजवण्यासाठी डांबराचे पॅच मारले असून त्यामुळे हा रस्ता आणखी खडबडीत झाला आहे. एका महिन्यात नव्याने सुरू झालेल्या पुलाची अशा रितीने चाळण होणे हा देखील एक अनोखा रेकॉर्डच म्हणावा लागेल. या संदर्भात मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी X वर एक पोस्ट केली आहे.
डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लावणारा ‘चॅांदभाई' कोण ?
राजू पाटील यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये म्हटले आहे की, "4 जुलै म्हणजेच महिन्याभरापूर्वी लोकार्पण झालेल्या पलावा पूल 30 दिवसांत खड्डेमय झाला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा' याचं प्रात्यक्षिक अशा अनोख्या अंदाजात सरकारने केलं याबद्दल शंकाच नाही कारण या आधीही शिंदे अँड सन्स कंपनीने डोंबिवलीकरांच्या भावनांशी, पैशांशी आणि निकृष्ट कामाच्या रूपाने जीवाशी खेळ केलेलाच आहे.आणि म्हणूनच त्यांचे सहकारीच त्यांना नाव न घेता डोंबिवलीच्या विकासाला लागलेले ग्रहण म्हणत आहेत.अर्थात डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लावणारा ‘चॅांदभाई' कोण ? हे सर्वांना माहित आहे.
( नक्की वाचा: डोंबिवलीतील पलावा पुल उद्घाटनानंतर काही वेळातच बंद! काय झाला गोंधळ? )
पलावा पूल म्हणजे अक्षरशः डोंबाऱ्याचा खेळ झालाय.. गुणवत्तेच्या नावाने ढोल पिटले.करदात्या जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च तर झाले.पण नेमकं कोणाचा खिसा गरम करायला आणि पुलाची गुणवत्ता कुठे हरवली याचा शोध घेणार का ? या कामाचं ऑडिट होणार का ? जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई होणार का ? असे अनेक प्रश्न तुमची वाट पाहत उभे आहेत, त्याची उत्तरं तुम्हालाच द्यावी लागतील कारण ‘त्यांच्या' सत्तेत इथे 25/30 वर्ष तुम्ही पण भागीदार आहात. अर्थात ‘त्यांच्या' पापात भागीदार व्हायचे नसेल तर यापुढे या ‘चांदभाईंची' नावं घेऊन बोललात तर बरं होईल,हा मित्र म्हणून सल्ला आहे, तो पटला तर घ्या नाहीत द्या पलावा पुलाच्या खड्ड्यात टाकून."