पालघर पूर्व येथील 'मस्तांग इंटरप्रायजेस' या कंपनीत गेल्या 15 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या 6 महिला कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक कामावरून काढून टाकलं. कंपनीच्या सुपरवायझरने केलेल्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवल्यामुळेच ही अन्यायकारक कारवाई करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी पीडित महिलांनी मनसे कामगार सेनेच्या पाठिंब्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
सुपरवायझरच्या लैंगिक छळाची तक्रार पडली महागात
उपोषणकर्त्या महिला कामगार मंगला पवार, रेखा चव्हाण, पल्लवी तीरमल्ली आणि निकिता कुवरे यांच्यासह अन्य दोन महिला मस्तांग इंटरप्रायजेसमध्ये प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहेत. महिलांचा असा आरोप आहे की, कंपनीचा सुपरवायझर जतीन पाटील हा महिला कामगारांचा मानसिक आणि लैंगिक छळ करत होता. या छळाचा त्रास असह्य झाल्याने महिलांनी एकत्र येऊन याची रीतसर तक्रार कंपनी व्यवस्थापनाकडे केली. मात्र, दोषी सुपरवायझरवर कारवाई करण्याऐवजी कंपनी प्रशासनाने तक्रारदार 6 महिलांनाच थेट कामावरून निलंबित करून बाहेरचा रस्ता दाखवला.
(नक्की वाचा- तुकाराम मुंढेंना हलक्यात घेतलं; नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध हॉटेलसह 6 हॉटेल्सला दणका, FDA ची मोठी कारवाई)
आंदोलक महिलेची प्रकृती खालावली
सहायक कामगार आयुक्त दिनेश दाभाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार उपायुक्त कार्यालयाने पालघर पोलीस आणि कंपनी व्यवस्थापनासोबत हा वाद मिटवण्यासाठी अनेक संयुक्त बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, कंपनी प्रशासनाने कमालीचे आडमुठे धोरण अवलंबले असून, त्यांनी आता या बैठकांना येणेच बंद केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणात बसलेल्या महिला कामगार निकिता कुवरे यांची तब्येत झपाट्याने ढासळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांची तपासणी केली आहे.
भागीदाराने कामगारांच्या अंगावर कार घातल्याचा जुना इतिहास
या कंपनीतील कामगारांचा संघर्ष जुना असून यापूर्वी 5 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीच्या गेटसमोर कामगारांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी कंपनीच्या भागीदार नाझनीन कात्रक यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर थेट कार घातली होती. या जीवघेण्या हल्ल्यात विद्या यादव ही महिला कामगार गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, कंपनी प्रशासनाची कामगारांविषयीची क्रूर आणि आडमुठी भूमिका यावरून पुन्हा सिद्ध होत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
(नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
"आम्ही 15 वर्षांपासून रक्ताचे पाणी करून या कंपनीत काम केले. जेव्हा सुपरवायझर जतीन पाटील याच्या घाणेरड्या कृत्यांची तक्रार आम्ही मालकांकडे केली, तेव्हा आम्हालाच कामावरून काढून टाकण्यात आले. दोषी मोकाट फिरत आहेत आणि आम्हाला न्यायासाठी उन्हातान्हात उपोषणाला बसावे लागत आहे. आम्हाला आमची नोकरी आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही", अशी भूमिका पीडित महिलांची आहे.