- संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur News: पंढरपुरातील विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा (भीमा) नदीच्या पात्रातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नदी पात्रात पाणी टिकून राहू नये आणि वाळू उपसा करणे सोपे व्हावे, यासाठी वाळू तस्करांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजेच काढून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकारामुळे महर्षी वाल्मिक संघटनेने वाळू तस्करांवर थेट आरोप केला असून पंढरपुरात खळबळ उडाली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे नसल्यामुळे चंद्रभागा नदीच्या पात्रातील पाणी झपाट्याने वाहून जात असून, आगामी काळात भाविकांना स्नानासाठी पाणीच उपलब्ध होणार नाही, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
पाणी आणि वाळू वाहून जावी म्हणून कृत्य?
याबाबत माहिती देताना महर्षी वाल्मिक संघटनेचे गणेश अंकुशराव यांनी वाळू तस्करांवर गंभीर आरोप केले आहेत. "चंद्रभागेच्या पात्रात पाणी साठून राहू नये, याच एकमेव उद्देशाने वाळू तस्करांनी बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकले आहेत. दरवाजे काढल्यामुळे पाणी आणि वाळू शहराच्या पात्रात थांबतच नाही. पाणी पूर्णपणे तळाला पोहोचले असून याचा थेट फायदा वाळू तस्करांना बेकायदेशीर उपसा करण्यासाठी होत आहे," असे अंकुशराव यांनी सांगितले.
भाविकांवर वाळवंटात स्नान करण्याची वेळ येणार?
हिंदू धर्मामध्ये अधिक मास किंवा विशेष पर्वणीच्या काळात चंद्रभागेत स्नान करण्याचे मोठे धार्मिक महत्त्व मानले जाते. पण बंधाऱ्याची दुरवस्था अशीच राहिली तर नदीपात्र कोरडं पडण्याची शक्यता आहे. "प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून जाईल. परिणामी पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेच्या पवित्र पात्राऐवजी वाळवंटात स्नान करण्याची वेळ येईल," असा इशाराही संघटनेने दिला आहे.
(नक्की वाचा : Chandrapur Tiger Attack: थरकाप उडवणारी घटना! 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चौघींचा मृत्यू, महाराष्ट्र हादरला)
'रोहिंग्या' कामगारांकडून वाळू उपसा? पंढरपुरात उलट-सुलट चर्चावाळू उपासासाठी बिहारमधून विशेष कामगार आणण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर या बेकायदेशीर कामासाठी बांगलादेशी रोहिंग्या कामगारांना देखील आणले गेले असल्याची जोरदार चर्चा सध्या पंढरपूरच्या स्थानिक जनतेमध्ये सुरू आहे. या प्रकरणामुळे नदीच्या सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस आणि संबंधित विभागाने यावर तत्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.