Aashadhi Wari Palkhi 2025: पालखी सोहळ्यादरम्यान पुण्यात 24 लाखांची चोरी, 4 महिलांसह सहाजण अटकेत

Pandharpur Wari 2025: गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि 6 च्या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे गस्त घालत असताना या चोरांना पकडले.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

Pune Palkhi 2025: ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुणे शहरामध्ये असतो. पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. अनेकजण पालख्या मुक्कामी असलेल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात तर काहीजण पालखीसोबत चालतात. पालखी सोहळ्याला होणाऱ्या गर्दीचा फायदा उचलत चोरटे चोऱ्या करत असतात. पुणे पोलिसांनी एका टोळीला पकडलं असून या टोळीने 24 लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. 

(नक्की वाचा: तुकाराम महाराजांच्या पालखीने पार केला रोटी घाट, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हेनगरीत)

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी यात्रेदरम्यान पुणे शहरात वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी उसळते. या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल फोन आणि महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका टोळीला पकडण्यात  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, एका 17 वर्षांच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

(नक्की वाचा: आज माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान)

गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि 6 च्या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे गस्त घालत असताना या चोरांना पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चांदनी शक्ती कांबळे (वय 32), रीटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (वय 35), बबिता सूरज उपाध्ये (वय 57), पूजा धीरज कांबळे (वय 35), गणेश विलास जाधव (वय 30) आणि अरबाज नौशाद शेख (वय 19, झारखंड) यांचा समावेश आहे.

(नक्की वाचा: पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी)

या आरोपींकडून 22.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 19,41,310 रुपये) आणि 14 मोबाईल हँडसेट (अंदाजे किंमत 4,50,000 रुपये) असा एकूण 23,91,130 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध हडपसर, वानवडी आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल आणि दागिन्यांच्या मूळ मालकांचा शोध सुरू केला आहे.

Advertisement

पालखी यात्रेदरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल किंवा महिलांचे दागिने चोरीला गेले आहेत, त्यांनी हडपसर किंवा वानवडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख आणि उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 आणि 6 च्या पथकांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Topics mentioned in this article