खड्डे हा मुंबईकरांसह राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा विषय. कारण खड्ड्यांमुळे होणारा त्रास हा कधी कधी नव्हे तर दररोज भोगावा लागत असतो. सरकारकडून रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वारंवार यावरून संताप व्यक्त केला जातो. कधी रस्त्यांवरील खड्ड्यांवरून गाणं तयार केलं जातं, कधी फोटो काढून व्हायरल केले जातात. पंढरपूरातून असाच एक प्रकार समोर आला आहे.
पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावर चंद्रभागा नदीला जोडलेल्या अहिल्या पुलावर असलेल्या खड्ड्यांची पूजा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने थेट खड्ड्यांची पूजा केली आहे. सुरज राठी असं या तरुणाचं नाव आहे. सुरजने खड्ड्यांमध्ये फुले वाहत प्रतिकात्मक मंत्रोच्चार करत खड्ड्याची पूजा मांडली. येथील आहिल्या पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कायम कोंडी होते.
नक्की वाचा - लाल साडी, लाल कॅप, शिट्टी अन् टॉर्च घेत महाराष्ट्रातील 'या' गावात महिलांची रात्रभर गस्त, कारण काय?
वाहन चालकांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास लक्षात घेता सुरज या तरुणाने खड्ड्यांची पुजाच मांडली. याच खड्ड्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुरज राठी या तरुणाने नामी शक्कल लढवत खड्ड्यांची पूजा केली. विशेष म्हणजे सुरजने केलेल्या खड्ड्यांची पूजा यावेळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पाहून प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता तरी अहिल्या पुलावरील खड्डे बुजवणार का? असा सवाल नागरिकांतून विचारला जातो.