जाहिरात
This Article is From May 06, 2024

पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित; मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात

पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व पंप टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित केल्यानंतर सर्वप्रथम संतुलन जलाशये व सेवा जलाशयांमधील जलसाठा पातळी पूर्ववत करणे, जलवाहिन्या योग्य दाबाने भारीत करणे (चार्जिंग) या प्रक्रियेला काही अवधी लागणार आहे.

पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित; मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात
मुंबई:

पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील 100 केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा आज (6 मे) सकाळी 10 वाजता अचानक खंडीत झाला. परिणामी संपूर्ण जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. ही यंत्रणा बंद झाल्याने पिसे येथून उदंचन केले जाणारे पाणी देखील थांबवावे लागले. महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हालचाली करुन, वीज पारेषण कंपनीशी समन्वय साधून सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुसऱ्या बाजूने पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले आहे. 

त्यामुळे मुंबईला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडीत न होता हळूहळू सुरु करण्यात येत आहे. या वीज बिघाडाच्या कालावधीत तसेच बंद पडलेली यंत्रणा पूर्वपदावर येईपर्यंत संतुलन जलाशये, तसेच सेवा जलाशयांमध्ये आवश्यक असलेला पाणीपुरवठा होत नसल्याने त्यातील पाणी पातळी खालावली. तसेच मुख्य जलवाहिन्या रिक्त झाल्या होत्या.

पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व पंप टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित केल्यानंतर सर्वप्रथम संतुलन जलाशये व सेवा जलाशयांमधील जलसाठा पातळी पूर्ववत करणे, जलवाहिन्या योग्य दाबाने भारीत करणे (चार्जिंग) या प्रक्रियेला काही अवधी लागणार आहे. या सर्व तांत्रिक कारणांमुळे पांजरापूर येथून मुंबई-1 आणि मुंबई-2 या मुख्य जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे.

त्यामुळे मुंबई-1 या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए विभाग आदी परिसरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पुढील 24 तासांसाठी 10 टक्के पाणीकपात करावी लागणार आहे. तसेच, मुंबई-2 या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पूर्व उपनगरे, तसेच शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण, ई तसेच बी विभागातील काही परिसरांमध्ये पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणीकपात होणार आहे.

वीज पारेषण कंपनीकडून पडघा 100 केव्ही वीज उपकेंद्र ते पांजरापूर 3A 100 केव्ही वीज उपकेंद्र या संपूर्ण मार्गावर वीज बिघाड कुठे झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. पर्यायी वीज पुरवठ्या आधारे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी काही अवधी आवश्यक आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल. तोवर मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच पाणी काटकसरीने वापरावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com