प्रविण मुधोळकर, नागपूर
बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, "मला जालना येथील पालकमंत्रिपद मिळालं आहे. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव असं समजून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही."
(नक्की वाचा- Guardian Minister : शिवसैनिकांच्या आंदोलनाला यश; 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती)
"मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती. याचा मला अधिक आनंद झाला असता. माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे", असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
"जालन्याचं पालकमंत्रिपद मिळालं या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शवता मिळालेल्या संधीत जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहे ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील", असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
(नक्की वाचा- Guardian Minister: पालकमंत्र्यांना काय अधिकार असतात? इतकं महत्त्वाचं का असतं हे पद?)
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली यासंदर्भात मला काही माहिती नाही. मी याविषयी बोलणार नाही."