बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या प्रकरणात पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून परळीतील अनेक व्हिडिओ समोर येत आहे. हवेत गोळीबार करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तिघांना याचा फटका बसला आहे. माणिक हरिश्चंद्र फड, जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणे आणि कुणाल श्रीकांत फड या तिघांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार करून सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माणिक हरिश्चंद्र फड याच्याकडे परवानाधारक पिस्टल असून त्याने पिस्टलसह फोटो काढून सोशल माध्यमावर वायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणे याने 14 सप्टेंबर 2023 रोजी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक 12 बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला.
तर कुणाल श्रीकांत फड याने त्याच्याकडे पिस्टल परवाना नसता पिस्टलसह फोटो काढून सोशल माध्यमात अपलोड केला. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला. आता बीड पोलिसांनी असे अवैध शस्त्र बाळगून सोशल माध्यमावर दहशत पसरवणाऱ्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.
अंजली दमानियांकडून मोठे आरोप..
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या काही दिवसात या प्रकरणात एक ट्विट करीत सवाल उपस्थित केले आहेत. बीडमध्ये मोठ्या संख्येने शस्त्राचे परवाने का दिले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. परभणीत 32 शस्त्रांना परवाने देण्यात आले असून अमरावती ग्रामीणमध्ये २४३ शस्त्रांना परवाने देण्यात आले आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने का दिले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.