पुणे आणि लोणावळादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दुपारच्या वेळेतील लोकलचा प्रश्न अद्याप कायम आहे. रेल्वे प्रशासनाने दुपारी 12 ते 3 या वेळेत देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेणे आवश्यक असल्याचे सांगून दुपारच्या वेळी फेऱ्या पुन्हा सुरू करण्यास नकार दिला आहे. दुपारच्या वेळेत लोकल सेवा नसल्याने नागरिकांना आणि खासकरून विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागतोय.
नक्की वाचा: पुणे जिल्ह्यातल्या 'या' टोलनाक्यांवरही सुरु झाला फास्टॅग, वाचा सर्व माहिती
कोविडनंतर दुपारच्या लोकल बंद
कोविड-19 महामारीपूर्वी या मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल धावत होत्या, पण कोविडनंतर दुपारच्या वेळी पुणे-लोणावळ्यादरम्यानची लोकलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रवाशांना पुढील लोकलसाठी दोन ते तीन तास थांबावे लागते, ज्यामुळे त्यांचा बराच वेळ वाया जातो. बससेवा हा एक पर्याय असला तरी, तो वेळखाऊ आणि सोयीचा नसल्यामुळे अनेक जण रेल्वे स्थानकांवरच वाट पाहणे पसंत करतात.
विद्यार्थ्यांचे होतायत जास्त हाल
या मार्गावर दररोज 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करतात. लोणावळा ते तळेगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 8,000 आहे. त्यांची शाळा किंवा महाविद्यालये दुपारनंतर सुटतात. त्यामुळे, त्यांना घरी परतण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ स्थानकावर थांबावे लागते. प्रवाशांनी अनेकवेळा या समस्येबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि मुंबईप्रमाणे देखभाल ब्लॉक फक्त शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये ठेवण्याची विनंती केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दुरुस्ती, देखभाल दररोज करणे आवश्यक असून ती दुपारच्या सुमारासच करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
नक्की वाचा: रेल्वे प्रवासात किती सामान सोबत घेऊन जाता येते? मर्यादा ओलांडल्यास भरावा लागेल दंड
तिसऱ्या-चौथ्या मार्गाला मंजुरी
एकीकडे प्रवाशांची ही गैरसोय सुरू असताना, दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाने पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग उभारण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय भविष्यात वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि औद्योगिक विकासाला गती देण्यास मदत करेल. मात्र, सध्याची प्रवाशांची समस्या तत्काळ सोडवण्यासाठी काहीतरी वेगळा उपाय करण्याची गरज आहे.