
Fastag Annual Pass: पुणे जिल्हयातील खेडशिवापूर टोल प्लाझा, पाटस टोल प्लाझा, सरडेवाडी टोल प्लाझा आणि चालकवाडी टोल प्लाझा वर अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी, प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरू होणार आहे. प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी ही माहिती दिली आहे.
कुणासाठी आहे योजना?
ही योजना फक्त अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी आणि प्रवाशांसाठी असणार आहे. वार्षिक टोल (फास्टॅग) पासची वैधता 1 वर्ष किंवा 200 एकेरी वाहनांच्या फेऱ्यांसाठी यापैकी जे आधी होईल ते लागू राहील. फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय दुतगती महामार्गावरील टोल प्लाझांसाठी वैध असून, वार्षिक टोल (फास्टॅग) पासची किंमत फक्त तीन हजार रुपये इतकी राहील.
वार्षिक टोल पास (फास्टॅग) मिळविण्यासाठी तसेच सक्रियता आणि नूतनीकरणासाठी राजमार्ग यात्रा मोबाईल अॅपवर तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास देशभर लागू! काय होणार फायदा? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं )
फास्ट टॅगचा वार्षिक पास काय आहे?
फास्टॅगचा वार्षिक पास हा खासगी वाहनांसाठी (कार आणि इतर खासगी वाहने) तयार केलेला प्रीपेड पास आहे. हा पास 15 ऑगस्टपासून सुरु झाला आहे आणि त्याची किंमत 3,000 रुपये आहे. लोकांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने हा पास जारी केला आहे.
हा पास कुठं खरेदी करणार?
तुम्हाला हा वार्षिक पास घ्यायचा असेल, तर तुम्ही तो 'राजमार्ग यात्रा' मोबाइल ॲप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. एकदा तुम्ही तिथे पेमेंट केले की, तुमचा वार्षिक पास सक्रिय होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world