Pune News: पवना धरणातील पुरातन वाघेश्वर मंदिर 8 महिन्यांनी पाण्याबाहेर, महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ण्यातील मावळ तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि इतिहासाची साक्ष देणारं वाघेश्वर मंदिर तब्बल 8 महिन्यांनंतर पाण्याबाहेर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pawna Lake Wagheshwar Temple ।atest News
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pawna Lake Wagheshwar Temple :  पुण्यातील मावळ तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि इतिहासाची साक्ष देणारं वाघेश्वर मंदिर तब्बल 8 महिन्यांनंतर पाण्याबाहेर आलं आहे.पवना धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे हे हेमाडपंथी मंदिर भाविकांसाठी खुलं झालं असून महादेवाच्या दर्शनासाठी आता गर्दी होऊ लागली आहे. काय आहे या मंदिराचा इतिहास आणि शिवकाळातील संदर्भ? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती. 

मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या निळ्याशार पाण्यात 8 महिने जलसमाधी घेणारं वाघेश्वर मंदिर आता पूर्णपणे पाण्याबाहेर आलं आहे.1971 मध्ये धरणाचे पाणी साठवण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून हे पुरातन मंदिर  वर्षातील बराच काळ धरणाच्या पाण्याखाली गुडूप असते.पण मार्च अखेर पाण्याची पातळी कमी होताच,हे मंदिर एखाद्या लेण्यासारखं प्रकट होतं, अशी माहिती पुजारी लक्ष्मण गुरव यांनी दिली आहे. 

Advertisement

700 ते 800 वर्षांपूर्वीचं हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना मानलं जातं.संशोधकांच्या माहितीनुसार, या मंदिराचं बांधकाम 11 व्या किंवा 12 व्या शतकात झालं असावं.सिमेंट किंवा कोणत्याही आधुनिक साहित्याचा वापर न करता केवळ दगड एकमेकांत गुंफून हे मंदिर उभारण्यात आलं आहे.जरी आज या मंदिराचा केवळ ढाचा आणि गाभारा शिल्लक असला तरी इथलं कोरीव काम आजही पर्यटकांना थक्क करतं,असं पर्यटक ऋतुजा कदम यांनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> LSG vs KKR : 6,6,6,6 रिंकूने ठोकले एका पाठोपाठ 4 सिक्सर, लखनऊच्या फलंदाजांनीही केली कमाल, सुपर ओव्हर अन्..

काय आहेत या मंदिराची खास वैशिष्ट्ये?

या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वाची मोठी जोड आहे.असं म्हटलं जातं की,कोकण आणि सिंधुदुर्गची मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून या वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. इतकंच नाही,तर महाराज जेव्हा जेव्हा जवळच्या तिकोणा किंवा तुंग किल्ल्यावर येत,तेव्हा ते या शिवचरणी नतमस्तक व्हायला विसरत नसत. मात्र,काळाच्या ओघात आणि वर्षानुवर्षे पाण्याखाली राहिल्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याची मोठी पडझड झाली आहे. मंदिराचा कळस ढासळला असून भिंतींना भेगा पडल्या आहेत.

सध्या केवळ गाभारा सुस्थितीत असून आजूबाजूला फक्त मंदिराचे अवशेष उरले आहेत.त्यामुळेच,पुरातत्व विभागाने या मंदिराचे तातडीने संवर्धन करावे,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुढचे तीन ते चार महिने हे मंदिर भाविकांसाठी खुलं असेल.इथली वाढती गर्दी पाहता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था करावी,अशी विनंती स्थानिक आणि शिवप्रेमी करत आहेत.पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच पुढील काही महिनेच या मंदिराचं अस्तित्व जमिनीवर दिसणार आहे.इतिहासाची साक्ष देणारं हे मंदिर जपण्यासाठी आता लोकचळवळ आणि सरकारी मदतीची नितांत गरज आहे.