मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांना अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित करामध्ये (VAT) कपात करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मुल्यवर्धित करामधील कपाती पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार आहे. तर डिझेल 2.07 पैशांना स्वस्त होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.
पेट्रोल व डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर 26 टक्के अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे वरुन 25 टक्के अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2.07 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.