Fuel Stock Status: राज्यात सध्या इंधन पुरवठ्यावरून मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे चक्क पोलिसांच्या बंदोबस्तात पेट्रोलचे वाटप करावे लागले, तर हिंगोली आणि परभणीमध्ये रात्री उशीरापर्यंत डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती. दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांनी पंपांवर एकच गर्दी केली. पण पेट्रोल डीलर्स असोसिएशनने शहरात 80 टक्के पंप बंद असण्याची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत नागरिकांना संयम राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणावरील परिस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
सिल्लोड: चक्क पोलिसांच्या पहाऱ्यात इंधन वाटप | Sillod: Fuel Distribution Under Police Protection
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात सोमवारी (18 मे) सकाळपासूनच पाच पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल संपल्याने वाहनधारक पुरते हवालदिल झाले होते. अखेर दुपारी 2 वाजेच्या सुमारास शहरातील 'ब्रह्मा पेट्रोल पंप' येथे इंधनाचा टँकर दाखल झाला. इंधन आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच वाहनधारकांनी पंपावर एकच गर्दी केली. लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे पंपाच्या बाहेरील रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. सिल्लोडमध्ये चक्क पोलिसांच्या कडक बंदोबस्तात वाहनधारकांना इंधन वाटप करण्याची वेळ आली होती. (मोसिन शेख, प्रतिनिधी)
हिंगोली: मध्यरात्री डिझेलचा टँकर येताच शेतकऱ्यांची झुंबड | Hingoli: Farmers Rush As Diesel Tanker Arrives At Midnight
हिंगोली शहरातही इंधनासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील इंदिरा चौक परिसरात असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर मध्यरात्री डिझेलचा टँकर दाखल झाला. ही माहिती मिळताच रात्रीच्या वेळीच नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी डिझेल खरेदीसाठी पंपावर अलोट गर्दी केली. कित्येक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन तर काही वाहनधारक गाड्या घेऊन रांगेत उभे होते. ज्यांना वाहने आणणे शक्य नव्हते, ते हातात कॅन घेऊन डिझेलसाठी धावले. वाढत्या गर्दीमुळे पंपावर वाद होऊ नये म्हणून हिंगोली शहर पोलिसांकडून विशेष पेट्रोलिंग करण्यात आली. पोलिसांनी शेतकऱ्यांना आणि वाहनचालकांना शांततेत इंधन भरण्याचे आवाहन केले. (समाधान कांबळे, प्रतिनिधी)
परभणी: एकाच पंपावर डिझेल उपलब्ध; रात्री उशीरापर्यंत रांगा | Parbhani: Diesel Available At Only One Pump; Long Queues Till Late Nightपरभणी शहरातही इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. शहरात काही प्रमाणात पेट्रोल उपलब्ध असले तरी डिझेलसाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. शहरातील 'दुर्राणी फिलिंग स्टेशन' येथे डिझेल उपलब्ध असल्याची माहिती मिळताच, डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांनी रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती. या पंपावर मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. शेतीकामांचा हंगाम असल्याने ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी अनेक शेतकरी हातात कॅन (डबे) घेऊन रात्री उशीरापर्यंत पंपावर ताटकळत उभे होते. (नाजिर खान, प्रतिनिधी)
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरंच इंधनाचा तुटवडा आहे का? | Is There Really A Fuel Shortage In Pune And Pimpri Chinchwad?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पण "शहरातील 80 टक्के पेट्रोल पंप बंद असल्याची चर्चा केवळ एक अफवाह असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये," असे आवाहन पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी केले आहे. प्रतिनिधी सूरज कसबे यांनी याबाबतचे सविस्तर वृत्त दिलंय ते जाणून घेऊया...
(नक्की वाचा: Hingoli News : हाल संपेना...रात्रभर शेतकरी रांगेत, शेतीची कामं खोळंबली; वाढत्या गर्दीमुळे पोलिसही तैनात)
अफवांमुळे पंपांवर गर्दी; वाहनधारक ताटकळत | Crowds At Pumps Due To Rumors; Commuters Stranded
गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर इंधन संपणार असल्याच्या आणि पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या चुकीच्या बातम्या वेगाने पसरल्या. या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली. अनेक ठिकाणी नागरिक पेट्रोल मिळवण्यासाठी दीड ते दोन तास वेगवेगळ्या पंपांवर चकरा मारताना दिसले. काही पंपांवर अचानक गर्दी वाढल्यामुळे उपलब्ध साठा वेगाने संपला, ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही पंपचालकांनी बॅरिकेड्स लावून इंधन संपल्याचे फलक लावले होते. काही पंपचालकांनी अतिरिक्त इंधनाची मागणी केली असून ती प्रक्रिया सुरू आहे.
"80% पेट्रोल पंप बंदची चर्चा पूर्णपणे चुकीची" - ध्रुव रुपारेल | "80% Petrol Pumps Closed Rumor Is Completely False" - Dhruv Ruparel
नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी पुणे पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी अधिकृत भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, "पिंपरी-चिंचवडमधील 80 टक्के पेट्रोल पंप बंद असल्याच्या सोशल मीडियावरील बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इंधनाचा कोणताही अधिकृत तुटवडा नाही."
असोसिएशनने दिलीली महत्त्वाची माहिती | Important Information Provided By The Association
- सुरू असलेले पंप: पुणे जिल्ह्यात एकूण 1000 हून अधिक पेट्रोल पंप कार्यरत आहेत. यापैकी पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे 250 तर पुणे शहरात जवळपास 200 पेट्रोल पंप पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
- नियमित पुरवठा: लोणी काळभोर आणि तळेगाव येथील मुख्य आगारांतून (डेपो) पुणे आणि पिंपरी-चिंचवडला नियमितपणे इंधन पुरवठा केला जात आहे. तेल कंपन्यांकडून इंधन पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
- साठ्याबाबत स्पष्टीकरण: केवळ दोन दिवसांचाच इंधन साठा शिल्लक असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
केवळ तांत्रिक कारणांमुळे काही ठिकाणी अडचण | Issues At Some Places Due To Technical Reasons Only
असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, काही तांत्रिक किंवा स्थानिक कारणांमुळे क्वचित एखादा पेट्रोल पंप काही काळासाठी बंद असू शकतो, पण संपूर्ण शहरात नियमित इंधनपुरवठा सुरू आहे. विनाकारण होत असलेल्या गर्दीमुळे पंपांवर साठ्याचा तात्पुरता ताण निर्माण होत आहे.
प्रशासनाचे आणि असोसिएशनचे नागरिकांना आवाहन | Appeal To Citizens By Administration And Association
पेट्रोल डीलर असोसिएशन आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून धावपळ करू नये आणि गरजेपुरतेच इंधन भरावे, जेणेकरून पंपांवर अनावश्यक ताण येणार नाही. तसेच इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोलियम मंत्रालय किंवा तेल कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांचा (Websites) वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
Washim | Diesel साठी रात्री उशीरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा; डिझेलसाठी शेतकरी 4 ते 5 तास रांगेत उभे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world