सूरज कसबे, प्रतिनिधी
Pimpari Chinchwad Municipal Corporation News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत शहराच्या ओळखीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. "अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे,मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही",असे विधान आयुक्तांनी केले.या विधानामुळे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान गांधर्व मंच संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून होणाऱ्या या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयुक्त सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या जागतिक कीर्तीची तुलना महापालिकेच्या ओळखीशी केली आणि वादाची ठिणगी पडली.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन, 'या' कॉलेजमधील हॉस्टेलबाबत गंभीर तक्रारी, मुलीही त्रस्त
पत्रकारांचा जाब आणि नाराजी
आयुक्तांच्या या विधानावर उपस्थित पत्रकारांनी तत्काळ आक्षेप घेतला. पिंपरी-चिंचवड हे केवळ एक शहर नसून ते जागतिक स्तरावरील मोठे औद्योगिक केंद्र आहे.टाटा मोटर्स,एसकेएफ यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे या शहराची ओळख सातासमुद्रापार असताना खुद्द आयुक्तांनीच शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणे चुकीचे असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.
पिंपरी चिंचवड शहराच्या अस्मितेचा प्रश्न
शहरातील राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या विधानाचा निषेध केला आहे.ज्या शहराच्या महसुलावर महापालिका चालते. त्या शहराला जगात कोणी ओळखत नाही असे म्हणणे हा इथल्या कष्टकरी कामगारांचा आणि उद्योजकांचा अपमान आहे,अशी प्रतिक्रिया उमटत आहे.या विधानामुळे आता मूळ संगीत स्पर्धेच्या चर्चेपेक्षा आयुक्तांच्या विधानाचीच चर्चा शहरात रंगली आहे.
नक्की वाचा >> Ashok Kharat: खरातचा नवा कारनामा उघड, सोन्याऐवजी दिल्या पितळी अन् पुष्पराज अंगठ्या, उद्योगपतीची SIT कडे धाव
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world