सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
महाराष्ट्रामध्ये असलेल्या 288 विधानसभेच्या मतदारसंघातील पैकी पुणे जिल्ह्यातील पिंपरी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव आहे. सन 2008 साली लोकसभा आणि विधानसभा मदारसंघाच्या परिसीमन आदेशानंतर पिंपरी मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासूनच हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अजित पवारांचे निकटवर्तीय विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे आहेत.
मागील निवडणुकांचा निकाल
2009 साली पहिल्यांदा या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे निवडून आले होते. त्यानंतर 2014 ला युती सरकारच्या काळात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी तत्कालीन भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार हे विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अण्णा बनसोडे हे 19 हजार 808 मतांची आघाडी घेत विजयी झाले होते.
अण्णा बनसोडे यांना एकूण झालेल्या मतदानापैकी 86 हजार 985 तर , शिवसेनेचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना 67 हजार 177 मते पडली होती. मोठी चुरशीची लढत त्यावेळी झाली होती. कारण यावेळच्या विधानसभा निवडणुका या सर्वच पक्षांनी स्वबळावर लढल्या होत्या. त्यात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आला होता.
उमेदवारासाठी रस्सीखेच
त्यानंतर झालेल्या सत्ता संघर्षाचा फटका या मतदारसंघालाही बसला. त्यातच आता महायुती आणि महविकास आघाडीतील आजी-माजी आमदारांसह इच्छुक उमेदवारांनीसुद्धा एकमेकांच्या जागेवर दावे केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झालीय. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे असलेल्या या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी दावा केल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी कोंडीत सापडली आहे.
पक्षाने उमेदवारी नाकारली तरी बंडोखोरी करत सीमा सावळे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही सारं आलबेल नाही. 2014 साली या मतदारसंघातून निवडून आलेले माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार हे पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. तर तिकडे 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर करुनही ऐनवेळी उमेदवारीच तिकीट अण्णा बनसोडे यांना जाहीर केल्यानं नाराज झालेल्या माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार तयारी करत आहेत.
सर्व राजकीय समीकरणे पाहता आगामी काळात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात तिकीट वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलीच दमछाक होणार हे मात्र नक्की. असं असलं तरी युती आणि आघाडीचे आजी-माजी आमदार आणि इच्छुक उमेदवार हे युतीचा धर्म पाळत इमाने इतबारे पक्ष श्रेष्ठींचा आदेश पाळत काम करणार का? हे येणाऱ्या काळातच समजेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world