Pimpri Chinchwad News: बायकोने दारू पिण्यास नकार दिल्याने नवऱ्याची आत्महत्या; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

Pimpri Chinchwad News: पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याने संतापलेल्या अरविंद लक्ष्मण लोहार या पतीने घरात ठेवलेले ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. थेरगाव येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी विषारी दारूमुळे 18 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हे भीषण प्रकरण ताजे असतानाच, आता चिंचवड परिसरामधून दारूच्या व्यसनाशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याचा राग अनावर झाल्यामुळे एका पतीने विषारी औषध पिऊन आपली जीवन संपवलं आहे. या आत्महत्येच्या घटनेमुळे लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमका काय होता वाद?

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार असे आहे. अरविंद लोहार यांना दारू पिण्याचे प्रचंड व्यसन जडले होते. या व्यसनामुळे त्यांच्या घरात वारंवार खटके उडत असत. नेहमीप्रमाणे अरविंद यांनी दारू पिण्याचा हट्ट केला असता, त्यांच्या पत्नीने त्यांना दारू पिण्यास साफ नकार दिला. यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद आणि भांडण झाले. पत्नीने आपल्याला दारू पिण्यापासून रोखल्याचा राग अरविंद यांच्या मनाला एवढा लागला की, त्यांनी तातडीने घरात ठेवलेले ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.

Advertisement

(नक्की वाचा-  Khan Sir: खळबळजनक! खान सरांच्या कोचिंग क्लासवर गोळीबार; दोन दिवसांत संस्था उडवून देण्याची धमकी)

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

औषध प्यायल्यानंतर काही वेळातच अरविंद यांची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली आणि ते वेदनेने विव्हळू लागले. हे पाहताच त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र शरीरात विष पूर्णपणे पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)

या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पत्नीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, कौटुंबिक वादातूनच हा टोकाचा निर्णय घेतला गेला की यामागे आणखी काही कारण होते, याचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
 

Topics mentioned in this article