पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू,नागरिक संतप्त

पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 8 नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एकाच दिवसात परिसरातील 8 नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण औद्योगिक नगरीत एकच खळबळ उडाली आहे. या सामूहिक मृत्यूंमागे अवैध आणि बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी दारू) कारणीभूत असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणावरून आता शहरातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आणखी दोघांची मृत्यूशी झुंज

8 जणांचा मृत्यू झालेला असतानाच, याच परिसरातील इतर दोन नागरिकांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सुभाष डिगीकर, अक्षय अवसरमल अशी या दोघांची नावे आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा-  Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येने आत्महत्या का केली? उलटसुलट चर्चांना उधाण)

मृतांची नावे खालीलप्रमाणे

  1. पांडुरंग फुगे
  2. विजय प्रकाश राठोड
  3. राजेंद्र प्रकाश राठोड
  4. राजू राजपूत
  5. अकबर पठाण
  6. बाबा शेख
  7. आनंद देसाई
  8. आनंद निकाळजे

माजी महापौर योगेश बहल आक्रमक

परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असताना पोलीस याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. "अशा जीवघेण्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड पोलीस कधी जागे होणार?" असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी उघडपणे विषारी दारूचा आरोप करत असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र हा दावा तूर्तास फेटाळला आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी सांगितले की,  8 पैकी 5 नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी आणि आजारपणाने झाला आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

पोलिसांच्या दाव्यावर संशय का?

आश्चर्याची बाब म्हणजे, मृत पावलेल्या 8 पैकी 5 व्यक्तींना मृत्यूपूर्वी तीव्र चक्कर आली होती, अशी माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. सध्या मृत नागरिक आणि उपचार सुरू असलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे आणि आजारपणाचे नेमके कारण काय होते? याचा तपास पोलीस करत आहेत. हे सर्व नागरिक एकाच परिसरातील असल्याने मृत्यूचे रहस्य अधिक गडद झाले आहे. अधिकृत वैद्यकीय आणि व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यू विषारी दारूमुळे झाला की अन्य कारणाने, हे स्पष्ट होणार आहे. या संभ्रमामुळे फुगेवाडी परिसरातील रहिवासी कमालीच्या चिंतेत आहेत.
 

Topics mentioned in this article