सूरज कसबे , प्रतिनिधी
Pimpri Chinchwad Mayor Election 2026 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीला नवं वळण मिळालं आहे. या निवडणुकीवर सकाळपासून सुरू झालेला नाट्यमय घटनाक्रम, नेत्यांमधील नाराजी आणि शेवटच्या क्षणी बदललेली समीकरणे यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे. भाजपाने अंतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले असले तरी, राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणली आहे.
भाजपकडून रवी लांडगे आणि शर्मिला बाबर रिंगणात
महापौर पदासाठी भाजपकडून रवी लांडगे यांचे नाव निश्चित झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. लांडगे हे दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक असल्याने त्यांच्या नावाला पक्षाने पसंती दिली आहे. मात्र उपमहापौर पदासाठी मोठा पेच निर्माण झाला होता. सुरुवातीला विजय उर्फ शीतल शिंदे यांचे नाव या पदासाठी जाहीर करण्यात आले होते. पण शिंदे हे स्वतः महापौर पदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि महापालिकेतून निघून गेले. हा गोंधळ पाहता भाजपने शेवटच्या 10 मिनिटांत रणनीती बदलून शर्मिला बाबर यांना उपमहापौर पदासाठी रिंगणात उतरवले.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death :अजित दादांची चप्पल चोरून घरात केली होती पूजा; अमोल मिटकरींनी सांगितली काळजाला भिडणारी आठवण )
राष्ट्रवादी काँग्रेसची अनपेक्षित एन्ट्री
भाजपमधील अंतर्गत वाद आणि नगरसेवक शीतल शिंदे यांची नाराजी लक्षात घेताच राष्ट्रवादी काँग्रेसने ही संधी साधण्याचे ठरवले. राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी अचानक आपला अर्ज दाखल केला. यामुळे भाजपसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ही निवड बिनविरोध होईल असे वाटत होते, तिथे आता राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे मतदानाची वेळ आली आहे. महापालिकेत राजकीय फोडाफोडी होणार की भाजप आपले संख्याबळ टिकवून ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शत्रुघ्न काटे यांना मोठा झटका
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात जास्त चर्चा ही भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची होत आहे. महापौर पदासाठी त्यांचे नाव सर्वात आघाडीवर होते, मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या काळात आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात घेतलेली भूमिका काटे यांना महागात पडल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत असलेल्या विरोधामुळेच त्यांना या पदापासून मुकावे लागल्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजपमधील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.
निवडीचा अंतिम फैसला 6 फेब्रुवारीला
उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी अधिकृत घोषणा आणि मतदान 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत पार पडणार आहे. भाजपकडे असलेले बहुमत पाहता रवी लांडगे यांचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा दिसत असला तरी, उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर आणि राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांच्यात चुरस पाहायला मिळेल.
शीतल शिंदे यांची नाराजी भाजपला उपमहापौर पदाच्या निवडणुकीत किती महागात पडते की भाजप ही खिंड लढवते, हे 6 फेब्रुवारीला स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world