- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटांमध्ये वाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे
- विजयी उमेदवार उज्वला ढोरे आणि पराभूत उमेदवार अतुल शितोळे यांच्यातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला
- उज्वला ढोरे यांनी मतदारांना भाजपला क्रॉस वोट देण्याचा प्रचार केल्याचा आरोप होत आहे
सूरज कसबे
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात मोठे राजकीय युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 32 मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार उज्वला ढोरे आणि पराभूत उमेदवार अतुल शितोळे यांच्यातील वाद आता थेट आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. दोघांनी ही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांच्या पदरी निराशा आला आहे. भाजपने इथं सत्ता मिळवली आहे.
पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 32 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला ढोरे या विजयी झाल्या. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या मतदारांना 3 मते भाजपच्या उमेदवारांना द्या आणि 1 मत मला द्या असे सांगत आहेत. ढोरे यांनी क्रॉस व्होटिंगचा प्रचार करताना दिसत असल्याचा दावा त्यांच्याच पक्षातील नेत्याने केला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद ही या मुळे उफाळून आला आहे. हा व्हिडीओ किती खरा किती खोटा हा ही विषय आहे.
याच प्रभागातील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि पॅनल प्रमुख अतुल शितोळे यांनी उज्वला ढोरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ढोरे यांनी केलेल्या छुप्या प्रचारामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळेच माझा पराभव झाला असा आरोप त्यांनी आता केला आहे. बाहेरील पक्षातून आलेल्या आणि जिथे भेळ तिथे खेळ अशी वृत्ती असलेल्या उमेदवारांमुळेच शहरात राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकली नाही असेही शितोळे म्हणालेत.
दरम्यान शितोळे यांच्या आरोपांना उज्वला ढोरे यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपला विजय शितोळे यांच्या जिव्हारी लागल्यानेच ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. या वादामुळे प्रभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.विजयी होऊनही पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागणाऱ्या ढोरे आणि पराभवाचे खापर ढोरेंवर फोडणारे शितोळे यांच्यातील हे युद्ध आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यातून राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे हे मात्र नक्की.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world