सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 52 कोटींचा डल्ला मारण्यात आला आहे. हा भ्रष्टाचार दुसरा-तिसरा कोणी नव्हे तर ज्यांच्याकडे हिशोब ठेवण्याची जबाबदारी आहे, त्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अर्थात कॅफो प्रवीण जैन यांनीच केला, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केला आहे.
आठवड्याभरात ५२ कोटींची बिलं...
पालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प सादर झाला आणि पहिल्याचं आठवड्यात हा अपहार करण्यात आल्याचे पुरावे बारणेंच्या हाती असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक महिने बिल लटकवून ठेवणाऱ्यांनी बोगस उपसूचनांच्या नावाखाली अवघ्या आठवड्याभरातचं तब्बल ५२ कोटी रुपयांची बिले अदा केल्याचा खळबळजनक आरोप बारणेंनी केला आहे. तसेच या उपसूचनांवर त्या-त्या प्रभागातील सर्व पक्षीय नगरसेवकांच्या सह्या आहेत. या सह्या नगरसेवकांना अंधारात ठेऊन घेतल्यात की त्या ही बनावट आहेत? याबाबतची शंका ही बारणेंनी उपस्थित केली.
संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचा दावा करत बारणेंनी कॅफोंना घेरलं. स्थायी समिती, सर्व साधारण सभा अथवा महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर बिलं अदा करावी लागतात. प्रत्यक्षात 24 ते 31 मार्चदरम्यान कॅफोंनी नियमांना तिलांजली देऊन सत्तरहून अधिक कामांची 52 कोटींची बिलं अदा केली आहेत. हा भ्रष्टाचार म्हणजे पालिकेची लूट आहे. असे आरोप करत बारणेंनी जैन यांचा कॅफोंचा चार्ज काढून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. या गंभीर आरोपांवर कॅफो जैन यांची बाजू घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.