-सूरज कसबे, प्रतिनिधी
Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असतानाही, या नियमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या 38 घरमालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. एप्रिल 2026 मध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत या घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
विशेष मोहिमेचा उद्देश
शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यक्ती, विशेषतः संशयित बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि सुरक्षेला बाधा पोहोचवणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि स्थानिक तपास पथकांनी (ATC) संयुक्तपणे शहरात भाडेकरूंची सखोल पडताळणी केली. यावेळी अनेक घरमालकांनी भाडेकरूंची कोणतीही कायदेशीर नोंद पोलिसांकडे केली नसल्याचे समोर आले.
(नक्की वाचा : Pune News : मिसिंग लिंकवरुन जाताना ही चूक करू नका; महामार्ग पोलिसांकडून मोठी कारवाई)
कायदेशीर तरतुदी आणि कारवाई
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163नुसार, घरामध्ये नवीन भाडेकरू ठेवल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित 38 घरमालकांवर भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223 अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नियमांचे पालन न करणे आता घरमालकांच्या अंगाशी आले आहे.
Photo Credit: NDTV Marathi
पोलीस उपायुक्तांचे आवाहनपोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, शहराच्या सुरक्षिततेसाठी घरमालकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची कागदपत्रे तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करून त्यांची अधिकृत पडताळणी करून घ्यावी. तसेच परिसरात कोणीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.