सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : महाराष्ट्र दिनानिमित्त बहुप्रतिक्षीत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकापर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं. जवळपास 6695 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या मिसिंग लिंकमुळे 6 किमीचं अंतर कमी होणार असून प्रवाशांची 30 मिनिटांची बचतही होणार आहे.
हा नवीन मार्ग मुंबईहून खोपोली लोणावळ्याजवळ असलेल्या कुसगावला जोडतो. हा मार्ग सुरु झाल्यानंतर जुन्या घाट सेक्शनमधील जवळपास 70 टक्के ट्रॅफिक डायव्हर्ट होण्याची अपेक्षा आहे.
मिसिंग लिंकवरुन जाताना ही चूक करू नका...
मिसिंग लिंकवरुन जाणाऱ्या कारविरोधात महामार्ग पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. मिसिंग लिंकवर वाहन थांबवणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. मुळातच द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हा मिसिंग लिंक उभारण्यात आलाय. त्याचं दृष्टीने मिसिंग लिंकवर वाहनं थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरी अनेक प्रवाशांकडून हे जीवघेणे प्रकार सुरुच आहेत. सकाळपासून हे प्रमाण वाढल्याचं आढळून आल्यानं आता महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. तुम्हाला या कारवाईला सामोरं जायचं नसेल तर मिसिंग लिंकवरुन विना थांबता सुखकर प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world