सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड
पुणेकरांनंतर आता शेजारील पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवरही पाण्याचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन तो आता अवघा 21.82 टक्क्यांवर आला आहे. सध्यातरी हा उपलब्ध पाणीसाठा जून महिन्याअखेरपर्यंत पुरेल असा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी यंदा जर मान्सून लांबला, तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तीव्र जलसंकट निर्माण होऊ शकते.
आंद्रा धरणाची साथ सुटणार?
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला सध्या रावेत बंधाऱ्यातून दररोज 520 एमएलडी आणि इतर पाणी प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला अतिरिक्त पाणी पुरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आंद्रा धरणातील पाणीसाठा देखील घटून 30.81 टक्क्यांवर आल्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी कमालीची वाढली आहे. दोन्ही प्रमुख धरणांमधील पाणी पातळी खालावल्याने शहरात अधिकृत पाणीकपात (Water Cut) लागू होणार का, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
सध्यातरी पाणीकपात नाही, मात्र पालिकेचे महत्त्वाचे आवाहन
धरणाचे पात्र वेगाने कोरडे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. पालिकेने स्पष्ट केले की, सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचे अत्यंत चोख आणि योग्य नियोजन करून शहरात समन्यायी पद्धतीने पुरवठा केला जात आहे. सध्यातरी शहरात अधिकृतपणे कोणतीही नवीन पाणीकपात लागू करण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा अंतिम निर्णय झालेला नाही.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
महापालिका प्रशासनाने शहरातील सोसायट्या आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, आगामी काळात संभाव्य टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि जपून करावा. गाड्या धुणे, अंगणात पाणी मारणे यांसारख्या गोष्टींसाठी पाण्याचा अपव्यय टाळावा, जेणेकरून मान्सून येईपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल.