250 हून अधिक गुन्ह्यांचा तपास, दोषींना कडक शिक्षा मिळवून देणारा धाराशिवचा प्लुटो शहीद  

प्लुटोने आजपर्यंत 260 गुन्ह्यांची उकल केली. अगदी घरफोडी ते खुनाच्या गुन्ह्यातले आरोपी प्लुटोने पकडून दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशिव:

अझर शेख

250 गुन्हांचा तपास करणारा आणि 95 गुन्ह्यांची उकल करणारा, दोषींना कडक शिक्षा मिळवून देणारा धाराशिव पोलीस दलातील प्लुटो आज शहीद झालाय. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे एका घरफोडीच्या तपासासाठी प्लुटोला नेले असता अचानक त्याचं निधन झालं. सात वर्षांच्या प्लुटो श्वानाचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या हँडलरवर मोठा आघात झाला आहे. 

सात वर्षांच्या प्लुटोने आतापर्यंत 250 गुन्हांचा तपास केला असून यापैकी 95 गुन्हे उघड केले आहेत. यामध्ये खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात त्याच्यामुळेच आरोपीला शिक्षा झाली. या कामगिरीच्या बळावर त्याला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. मात्र कर्तव्यावर असताना तो शहीद झाल्याने आनंद नगर पोलीस ठाणे परिसरात शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्लुटोच्या मृत्यूने त्याचा हँडलर स्वप्नील ढोणे यांच्या कुटुंबीयांसह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

प्लुटोने आजपर्यंत 260 गुन्ह्यांची उकल केली. अगदी घरफोडी ते खुनाच्या गुन्ह्यातले आरोपी प्लुटोने पकडून दिले. आज नेहमीप्रमाणे तुळजापूरातल्या अणदूर येथे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपासाकरता प्लुटो गेला असताना अचानक त्याला दम लागला. आपल्या सहकाऱ्याचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात येताच पोलिसांनी त्याला थेट पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं.

प्राथमिक उपचारही झाले. पुढील उपचारासांठी सोलापूरला जाण्याआधीच प्लुटो नावाच्या ताऱ्याने हे जग सोडलेलं होतं. यावेळी प्लुटोची जबाबदारी घेतलेला हँडलर स्वप्नील ढोणे तर हमसून हमसून रडत होता.

Advertisement

आतापर्यंत आपली साथ देणारा जिगरी दोस्त आज आपली साथ सोडून जातोय हे त्याला सहनच होत नव्हतं. ढोणे कुटुंबाने प्लुटोच्या पार्थिवाला ओवाळलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाकडून शासकीय इतमामात प्लुटोला मानवंदना देण्यात आली.