पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी ‘मी पाहिलेले आणि अनुभवलेले मोदीजी…' या शीर्षकाखाली एक लेख लिहिला आहे, ज्यात त्यांनी मोदींसोबतची त्यांची पहिली भेट कशी होती, याबद्दल सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, नागपूरमध्ये एका अभ्यासवर्गादरम्यान मोदीजींनी एका सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे केलेल्या व्यवहारामुळे ते प्रभावित झाले आणि ती आठवण आजही त्यांच्या मनात कोरलेली आहे.
कशी आणि कुठे झाली पहिली भेट?
देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना ही भेट झाली होती. नागपूरमधील रेशीमबागेत एका अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाची जबाबदारी फडणवीसांवर होती. तेव्हा मोदीजी त्या अभ्यासवर्गासाठी आले होते. त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर कार्यक्रमात सहभागी झाले. फडणवीस सांगतात की, कार्यक्रमाला आलेल्या इतर नेत्यांप्रमाणे मोदीजींनी गेस्टहाऊसमध्ये राहण्याऐवजी रेशीमबागेतीलच एका सामान्य खोलीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या साधेपणाने आणि कणखर नेतृत्वाने फडणवीसांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदराचे स्थान निर्माण झाले, जे आजही कायम आहे.
कणखर नेतृत्व, विकासाचे पर्व
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले की, 2014 च्या अनागोंदी आणि भ्रष्टाचारातून देशाला बाहेर काढून तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्याचे श्रेय केवळ मोदीजींच्या कणखर नेतृत्वाला जाते. त्यांच्या काळात घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय, जसे की राम मंदिर निर्माण, अनुच्छेद 370 रद्द करणे आणि तिहेरी तलाकवर बंदी, हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे होते. गरिबांसाठीच्या योजना, ‘सर्जिकल स्ट्राइक' आणि ‘एअर स्ट्राइक' यांसारख्या धाडसी निर्णयांनी त्यांनी राष्ट्रहिताशी कोणतीही तडजोड केली नाही.
(नक्की वाचा- PM Modi Birthday: मोदींचा 75 वा वाढदिवस; त्यांच्या प्रवासातील काही दुर्मीळ फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील)
गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर आणले, 3 कोटी घरे बांधली, 15 कोटी घरांना नळजोडणी दिली, 12 कोटी शौचालये बांधली आणि 68 लाख पदपथ विक्रेत्यांना ‘पीएम स्वनिधी'चा लाभ दिला. 43.8 लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले, असे आकडेवारीसह फडणवीसांनी सांगितले.
PM मोदींचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम
नवी मुंबई विमानतळासारखे अनेक मोठे प्रकल्प त्यांच्या संकल्पनेमुळे लवकर मार्गी लागले. महाराष्ट्रावर त्यांचे विशेष प्रेम आहे आणि ते वेळोवेळी महाराष्ट्रातील प्रकल्पांना पाठिंबा देतात. इंदू मिल स्मारकासाठी साडेतीन हजार कोटींची जागा असो किंवा ‘पीएम आवास योजने'तील 30 लाख घरे, प्रत्येक गोष्टीत त्यांचा पाठिंबा असतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.