PMC Election Result 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांच्या पराभवाबाबत एक वेगळीच माहिती व्हायरल होत आहे. वसंत मोरे यांना या निवडणुकीत केवळ 666 मतं मिळाली असल्याचा दावा काही पोस्टमध्ये केला जात आहे.
सोशल मीडियावरील फॉलोअर्स आणि मिळालेली मते
वसंत मोरे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी ओळखले जातात. फेसबुकवर त्यांचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर X या प्लॅटफॉर्मवर त्यांना 48 हजार लोक फॉलो करतात. त्यांच्या या मोठ्या फॉलोअर्स संख्येमुळेच त्यांना केवळ 666 मतं मिळाली या दाव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते..या प्रकरणात त्यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
पुण्यातील कात्रज भागातील मातब्बर नेते आणि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या मोरे यांच्याबाबतच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती.
मात्र निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालात त्यांना 20 हजार पेक्षा जास्त मतं मिळाली असून त्यांनी भाजपा उमेदवाराला मोठी झुंज दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार )
काय आहे सत्य?
वसंत मोरे यांनी स्वतः फेसबुकवर एक व्हिडिओ करून त्यांना मिळालेल्या मतांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणूक लढवणाऱ्या वसंत मोरे यांना प्रत्यक्षात 20,868 मतं मिळाली आहेत.
या प्रभागातून भाजपचे उमेदवार व्यंकोजी खोपडे हे 21,878 मतं मिळवून विजयी झाले आहेत. याचाच अर्थ वसंत मोरे यांचा 1010 मतांनी पराभव झाला आहे. याच मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार स्वराज बाबर यांना 16,122 मतं मिळाली आहेत. त्यामुळे 666 मतं मिळाल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोरेंनी उपस्थित केले प्रश्न
पराभवानंतर वसंत मोरे यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर आणि आकड्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोरे यांच्या दाव्यानुसार, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील फरक पाहता दुसऱ्या दिवशी 1035 मतं वाढलेली दिसत आहेत आणि त्यांचा पराभव 1011 मतांनी झाला आहे. आयोगाने दिलेल्या सुरुवातीच्या प्रेस नोटनुसार 79,826 मतदान झाले होते, मात्र नंतर तो आकडा 78,719 कसा झाला, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
शेवटच्या 2 तासांत 16 टक्के मतदान वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले असून प्रभाग 38 मधील मतांच्या या तफावतीबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे.