Mira Bhayandar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या एका बड्या नेत्याविरोधात कारवाईचे थेट आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मिरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता आता कायद्याच्या कचाट्यात सापडले असून, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आणि आदिवासींची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे, या तक्रारींची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने (PMO) घेतली असून मुख्यमंत्री कार्यालयाला याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
नरेंद्र मेहता हे सेव्हन इलेव्हन कंपनीचे मालक असून या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जमिनींचे मोठे गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मेहता यांनी मिरा रोड परिसरातील कांदळवन क्षेत्रात (Mangroves) नियमांचे उल्लंघन करून सेव्हन इलेव्हन क्लबचे बांधकाम केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आधीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता हे प्रकरण केवळ पर्यावरणापुरते मर्यादित न राहता आर्थिक घोटाळ्याच्या वळणावर येऊन पोहोचले आहे.
( नक्की वाचा : Jitendra Awhad :'महाराजांना पायानं टिळा लावला...', आव्हाडांच्या वक्तव्यानं विधानसभा पेटली; वाचा नेमकं काय घडलं )
500 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवली?
नरेंद्र मेहता यांनी शेतकऱ्यांच्या आणि विशेषतः आदिवासींच्या जमिनी नोंदणीकृत न करता केवळ नाममात्र रकमेवर खरेदी केल्याचे समोर येत आहे. या प्रक्रियेत त्यांनी सरकारची सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवून सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर अपना घर प्रकल्पात 79 कोटी रुपयांचा वाळू रॉयल्टी घोटाळा आणि मेट्रो उड्डाणपूल प्रकल्पाची किंमत 217 कोटींवरून थेट 620 कोटी रुपयांपर्यंत नेल्याच्या प्रकरणाचीही आता चौकशी सुरू झाली आहे.
( नक्की वाचा : KDMC News: कल्याण डोंबिवलीत कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात मोठा झोल; मुदत नसतानाही पालिकेनं उधळले लाखो रुपये! )
महसूल मंत्र्यांच्या पत्रात भूमाफिया असा उल्लेख
या प्रकरणाला अधिक धार मिळाली ती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका कथित पत्रामुळे. या पत्रामध्ये नरेंद्र मेहता यांचा उल्लेख चक्क भूमाफिया असा करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा उचलून धरला असून मेहता यांनी आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आणि सरकारवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. हे पत्र आपण सभागृहात मांडणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले असून, भाजप आपल्याच पक्षातील अशा नेत्यांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नरेंद्र मेहतांनी फेटाळले सर्व आरोप
आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देताना आमदार नरेंद्र मेहता यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मिरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपवल्यामुळेच स्थानिक नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि तेच नाना पटोले यांना चुकीची माहिती पुरवत असल्याचा पलटवार मेहता यांनी केला आहे.
दरम्यान, एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची 2.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. आता थेट पंतप्रधानांनीच या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे मेहता यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, राज्य सरकार यावर काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.