जाहिरात

Jitendra Awhad :'महाराजांना पायानं टिळा लावला...', आव्हाडांच्या वक्तव्यानं विधानसभा पेटली; वाचा नेमकं काय घडलं

Jitendra Awhad Controversial Statement: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

Jitendra Awhad :'महाराजांना पायानं टिळा लावला...', आव्हाडांच्या वक्तव्यानं विधानसभा पेटली; वाचा नेमकं काय घडलं
Jitendra Awhad : या वक्तव्याचा आधार एका पुस्तकात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मुंबई:

Jitendra Awhad Controversial Statement: विधानसभेतील चर्चेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले आणि सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. अखेर विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आव्हाड यांनी सभागृहात माफी मागितली.

नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वर विधानसभेत महत्त्वाची चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा संदर्भ देताना जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली. महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी पायानं टिळा लावण्यात आला होता, असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केले. आपल्या या वक्तव्याचा आधार एका पुस्तकात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मात्र, हे विधान ऐकताच सत्ताधारी पक्षाचे आमदार अत्यंत आक्रमक झाले आणि त्यांनी आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : आता धर्मांतर करणं सोपं नाही! राज्य सरकारचा नवा कायदा; मुलांच्या हक्क आणि संपत्तीबाबत मोठी तरतूद )
 

सत्ताधारी आमदारांचा संताप आणि माफीची मागणी

आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर शंभुराजे देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला. कोणत्याही पुस्तकाचा चुकीचा संदर्भ देऊन आराध्य दैवताचा असा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. आव्हाड आपल्या सोयीनुसार भूमिका मांडत असून त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी देसाई यांनी केली. या गोंधळामुळे सभागृहाचे वातावरण बिघडले आणि कामकाज 10 मिनिटांसाठी थांबवावे लागले.

अध्यक्षांची समज आणि निलंबनाची मागणी

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना गांभीर्य राखणे आवश्यक आहे, असे त्यांनी बजावले. भाषणादरम्यान आपल्या आराध्य दैवताविषयी वादग्रस्त विधान करू नये, अशा शब्दांत त्यांनी आव्हाड यांना समज दिली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

अध्यक्षांच्या सूचनेनंतर आव्हाड यांनी सुरुवातीला आपले शब्द मागे घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, यामुळे सत्ताधारी आमदारांचे समाधान झाले नाही. दादा भुसे, नितेश राणे आणि योगेश सागर यांसारख्या नेत्यांनी आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही आणि कोणाला खुश करण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

( नक्की वाचा : LPG Shortage: आता गॅसऐवजी पुन्हा रॉकेल मिळणार? छगन भुजबळांनी सभागृहात दिली महत्त्वाची माहिती )
 

अखेर आव्हाड यांनी मानली चूक

सभागृहातील वाढता तणाव पाहता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना शेवटची ताकीद दिली. यापुढे असे वादग्रस्त विधान केल्यास कठोर कारवाई करत निलंबन करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी नमती भूमिका घेत त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आणि जाहीर माफी मागितली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com