पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या पर्यटन बससेवेचा विस्तार केला आहे. पर्यटकांच्या प्रचंड प्रतिसादाला पाहून, PMPML ने पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू केली आहे. यामुळे पुणेकरांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य लोणावळा तसेच ऐतिहासिक एकवीरा देवी मंदिराला भेट देणे अधिक सोपे आणि आरामदायी होणार आहे. PMPML ची ही विशेष सेवा 18 जुलै 2025 पासून सुरू झाली. PMPML ही सेवा 'पुणे पर्यटन' अंतर्गत सुरू करण्यात आली असून, आता प्रवाशांना लोणावळ्याचा प्रवास अधिक सुखकर आणि परवडणारा होणार आहे.
कुठे कुठे फिरता येणार?
PMPML ची ही पर्यटन बस पुणे येथून सुटून एकवीरादेवी मंदिर, कार्ला लेणी, वॅक्स म्युझियम, भुशी डॅम आणि मनशक्ती ध्यान केंद्र या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देईल. ही सर्व ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असतात. पर्यटकांचा प्रवास आणखी आरामदायी व्हावा यासाठी वातानुकूलित ई-बस वापरल्या जात आहेत.
बस कुठून सुटणार ?
ही बस सकाळी 7.30 वाजता पुण्याहून सुटेल आणि सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत परत पोहोचेल. यामुळे प्रवाशांना दिवसाभरात सर्व प्रमुख स्थळांना भेट देण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या पर्यटन बसेस पुणे स्टेशन, स्वारगेट आणि डेक्कन जिमखाना येथून सुटतील.
तिकीट दर
या प्रवासासाठी फक्त 500 रुपये तिकीट आकारले जाईल. हा अत्यंत परवडणारा दर असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. जर ग्रुपने सहल काढण्याचा विचार असेल, तर 33 प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले, तर त्यातील 5 प्रवाशांना तिकीट दरात 100 टक्के सवलत मिळेल. म्हणजेच 5 जणांचा प्रवास पूर्णपणे मोफत होईल.
बुकिंग कुठे करायची?
तिकिटांचे बुकिंग सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत करता येईल. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी 'पुणे पर्यटन - गुरव' यांच्याशी 9860509682 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, हेल्पलाइन क्रमांक 020-24545454 देखील उपलब्ध आहे.