Pune News: हिंजवडी घेणार मोकळा श्वास; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी PMRDA ने १६६ अतिक्रमणे हटवली

Pune News: हिंजवडी हा पुण्यातील एक महत्त्वाचा आयटी हब असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे

Pune News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सक्रिय झाले आहे. पीएमआरडीएने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून आपली अनधिकृत बांधकामे काढून घेतली आहेत.

हिंजवडी हा पुण्यातील एक महत्त्वाचा आयटी हब असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत एकूण १६६ अतिक्रमणांवर कार्यवाही करण्यात आली, ज्यामुळे वाहतुकीसाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध झाली आहे.

(नक्की वाचा- New Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पुण्यातून लवकरच 4 नव्या 'वंदे भारत एक्सप्रेस' धावणार)

कुठे आणि कशी झाली कारवाई?

  • विप्रो सर्कल - १४ अतिक्रमणांवर कारवाई.
  • लक्ष्मी चौक ते मेझा नाईन - ३८ अतिक्रमणांवर कारवाई.
  • माण रोड परिसर - ६६ अतिक्रमणांवर कारवाई.
  • लक्ष्मी चौक ते मारुंजी - ७३ अतिक्रमणांवर कारवाई.
  • माण गावनाला - २८ अतिक्रमणांवर कारवाई.
  • हिंजवडी अनधिकृत होर्डिंग्ज - १९ होर्डिंग्ज हटवण्यात आली.

(नक्की वाचा-  Cidco Lottery : सिडकोची लॉटरी काढण्यास उशीर का होत आहे? अंदाजे तारीख आली समोर)

पीएमआरडीएने केवळ कारवाई करून थांबले नसून, भविष्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्मशान भूमी रोड, वाकड रोड, फेज १ रोड तसेच हिंजवडी-माण आणि मारुंजी रोड भागात देखील सर्वेक्षण सुरू केले आहे. याचा उद्देश भविष्यातील अतिक्रमणे ओळखून त्यावर वेळेत कार्यवाही करणे हा आहे. या संपूर्ण कार्यवाहीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पीएमआरडीएने एक केंद्रीय नियंत्रण यंत्रणा उभारली आहे. ही यंत्रणा संपूर्ण कारवाईचे समन्वय साधेल आणि पुढील नियोजन करेल.

Topics mentioned in this article