प्रथमेश गडकरी, नवी मुंबई
नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले भाजपचे माजी नगरसेवक पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवी मुंबईचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील 28 माजी नगरसेवक आणि 24 पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Politics : CM फडणवीस - शिंदेंमध्ये शीतयुद्ध? या 5 कारणांमुळे महायुतीत फुट पडल्याची चर्चा)
सोमवारी मुंबईत दादर जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या 28 माजी नगरसेवकांनी माजी आमदार आणि तत्कालीन नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
मात्र, आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करण्यात आला आहे. भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेल्यानंतर नवी मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्याकडून या सर्व माजी नगरसेवकांना पक्षात पुन्हा प्रवेशासाठी 6 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
(नक्की वाचा- संपूर्ण सिनेमा पाहिला मग केली तक्रार, INOX-PVR ला द्यावे लागले 65 हजार रुपये; काय आहे प्रकरण? )
तसेच संदीप नाईक यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र वर्षाच्या आतच या माजी नगरसेवकांचा पुन्हा एकदा भाजपात पक्षप्रवेश पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता संदीप नाईकही भाजपमध्ये प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.