रामराजे शिंदे, नवी दिल्ली
महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागावाटपावरून सुरू असलेली धूसफूस आता थेट शिवसेना (UBT) पक्षाच्या अंतर्गत संघर्षात रूपांतरित झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले असून, पक्षाच्या हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सोडल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
वादाचे मुख्य कारण
मार्च महिन्यात महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीकडे खात्रीशीर निवडून येण्याची केवळ एकच जागा होती. या एका जागेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार चढाओढ होती. अशावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला. यामुळे महाविकास आघाडीतून शरद पवार एकमेव खासदार म्हणून बिनविरोध निवडून गेले. आदित्य ठाकरे हे प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही होते, मात्र राऊतांच्या भूमिकेमुळे चतुर्वेदींची संधी हुकली.
"2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत!"
नुकत्याच झालेल्या खासदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरेंचा पारा चढल्याची माहिती समोर येत आहे.. सुत्रांच्या माहितीनुसार, संतापलेल्या आदित्य यांनी थेट विधान केले की, *"2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत" या विधानामुळे पक्षांतर्गत दोन गट पडल्याची चर्चा आहे.
(नक्की वाचा- Shivsena Dispute: राज्यसभेवरुन मोठा कलह, आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर धरली? महिला नेत्याचा खळबळजनक दावा)
प्रियांका चतुर्वेदींची नाराजी
प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. "संजय राऊत यांनी पक्षासाठी जागा घेणे गरजेचे होते. त्यांनी शरद पवारांसाठी का प्रयत्न केला?" असा सवाल त्यांनी विचारल्याचं समजतंय. आपला संताप व्यक्त करून त्या बैठकीतून तडकाफडकी निघून गेल्याचीही माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
(नक्की वाचा- Ashok Kharat News: अशोक खरातचे VIDEO व्हायरल करत असाल तर सावधान! पोलिसांकडून दोघांना अटक)
दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काही खासदारांनी आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचीही कुजबूज होती. याची कुणकुण लागताच, 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी खासदारांशी संवादच साधला नाही, असे समजते. यामुळे पक्षातील युवा नेतृत्व आणि जुने जाणते नेते यांच्यातील दरी वाढत असल्याचे चित्र आहे.