जाहिरात

Ambernath News: अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसकडून निलंबन होताच 12 नगरसेवकांचा भाजपा प्रवेशाचा प्लॅन

Ambernath News: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. भाजपाला साथ देणाऱ्या 12 नगरसेवकांचा आता अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.

Ambernath News: अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसकडून निलंबन होताच 12 नगरसेवकांचा भाजपा प्रवेशाचा प्लॅन
अंबरनाथ:

Ambernath News: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. भाजपाला साथ देणाऱ्या 12 नगरसेवकांचा आता अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी केल्याने संतापलेल्या काँग्रेसने या 12 नगरसेवकांचे थेट निलंबन केले आहे. पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवताच हे सर्व नगरसेवक आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच हाती कमळ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय भूकंपामुळे अंबरनाथच्या सत्तेत मोठी उलथापालथ होणार आहे.

भाजपामध्ये करणार प्रवेश?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह 12 नगरसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. 

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या कारवाईचे पत्र जारी केले आहे. पक्षात राहून भाजपला साथ देणे या नगरसेवकांना महागात पडले असले, तरी आता त्यांनी आपला मोर्चा पूर्णपणे भाजपकडे वळवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगामी सभेत हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे.

( नक्की वाचा : BMC Election 2026: संतोष धुरीनंतर आणखी एका बड्या नेत्यानं राज ठाकरेंची साथ सोडली, पत्रात केले खळबळजनक आरोप )

कसं आहे सत्ता समीकरण?

अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे 15 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले होते. या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या 4 सदस्यांना सोबत घेऊन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आणि सत्तेचे गणित जुळवले. या विचित्र युतीमुळे 28 नगरसेवक असूनही शिंदे गटाला सत्तेपासून लांब राहावे लागले होते. 

या सर्व प्रकरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली होती. आता या नगरसेवकांना निलंबित करून काँग्रेसने कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात भाजपचे संख्याबळ वाढणार असल्याचे दिसत आहे.

अंबरनाथच्या राजकारणात नवे वळण

काँग्रेसच्या या 12 नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकारणाची दिशा बदलणार आहे. ज्या नगरसेवकांनी विरोधात निवडणूक लढवली, तेच आता भाजपच्या झेंड्याखाली येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आता स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद किती उरणार आणि भाजपला या नगरसेवकांच्या प्रवेशाने किती फायदा होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com