KDMC News Today : कल्याणमधील गोविंदवाडी परिसरात गटारच्या दूषित पाणी परिसरात साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापौर हर्षाली चौधरी-थविल यांच्या आदेशानंतरही अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.दूषित पाणी अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये टाकण्याच्या इशारा स्थानिक नगरसेविका समीना शेख यांनी दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील बिस्मिल्ला मशिदीजवळ गटारांचे पाणी तुंबले आहे.ज्यामुळे रमजान महिन्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नमाज पठाणासाठी मशिदीत जाणाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागते. ड्रेनेजची दुरुस्ती केली जात नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी-थविल यांनी या परिसराला भेट दिली होती.
नक्की वाचा >> भाजपचे नगरसेवक असलेले नवरा बायको अडचणीत, 40 महिला जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकल्या, नेमकं प्रकरण काय?
"समस्या सोडवली नाही, तर अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये..."
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने हा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले होते. परंतु अधिकाऱ्यांनी या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यानं समस्या जैसे थे आहे. गोविंदवाडी परिसरात मोठ्या संख्येने तबेले आहेत. या तबेल्यांमधील मलमूत्र थेट गटारीमध्ये सोडले जाते. मशिदीजवळ गटारीत पाणी साचले आहे. या समस्येबाबत स्थानिक नगरसेविका समीना शेख यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. समस्या लवकर दूर झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये येऊन दूषित पाणी टाकणार,असा इशारा त्यांनी दिला आहे.