जाहिरात

BMC News : मुंबईत ‘खड्डेमुक्त’ रस्त्यांचे काम कुठवर आले? आता एका क्लिकवर कळणार सर्व माहिती

Pothole-Free Mumbai : ता मुंबईकरांना त्यांच्या घरबसल्या शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती मिळणार आहे.

BMC News : मुंबईत ‘खड्डेमुक्त’ रस्त्यांचे काम कुठवर आले? आता एका क्लिकवर कळणार सर्व माहिती
BMC News : यामुळे कामांमध्ये अधिक पारदर्शकता येऊन नागरिक थेट प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील.
मुंबई:

Pothole-Free Mumbai : मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक नवा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. आता मुंबईकरांना त्यांच्या घरबसल्या शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे. यामुळे कामांमध्ये अधिक पारदर्शकता येऊन नागरिक थेट प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील.

प्रगतीचा पारदर्शक डॅशबोर्ड

महानगरपालिकेने सुरू केलेल्या या डॅशबोर्डवर प्रत्येक परिमंडळ आणि विभागानुसार रस्ते काँक्रिटीकरणाची सध्याची स्थिती पाहता येते. यात पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली कामे, सध्या सुरू असलेली कामे आणि अद्याप सुरू न झालेली कामे यांची माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, यंदाचा पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणती कामे हाती घेतली जाणार आहेत आणि ती पूर्ण होण्यास अंदाजे किती कालावधी लागेल, याचे वेळापत्रकही यावर पाहता येणार आहे.

( नक्की वाचा :  Train Ticket : दसरा, दिवाळीसाठी तिकीट काढायला विसरलात? 'या' पद्धतीनं मिळेल कन्फर्म तिकीट, वाचा संपूर्ण प्रोसेस )
 

प्रकल्पाची सद्यस्थिती

एकूण टप्पे 1 आणि 2 मधील रस्ते: 2,121 रस्ते, एकूण 698.73 किलोमीटर लांबी
पूर्ण झालेले रस्ते: 771 रस्ते, एकूण 186.00 किलोमीटर लांबी
अंशतः पूर्ण झालेले रस्ते: 574 रस्ते, एकूण 156.74 किलोमीटर लांबी
एकूण पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी: 49.07%
पावसाळ्यानंतर सुरू होणारी कामे: 776 रस्ते, एकूण 208.70 किलोमीटर लांबी

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले की, या कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांना कामांदरम्यान कमीत कमी गैरसोय होईल याची काळजी घेतली जाईल, तसेच कामाचा दर्जा सर्वोच्च राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तांत्रिक आणि गुणात्मक तपासणी

या प्रकल्पाची गुणवत्ता राखण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई यांची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे कामाचे निकष आणि दर्जा काटेकोरपणे राखले जात आहेत. काँक्रिट रस्त्यांमुळे वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार असून, खड्डे पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने देखभालीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

माहिती कशी मिळवाल?

नागरिक BMC च्या मुख्य वेबसाइट https://www.mcgm.gov.in/ वर जाऊन 'For Citizens' > 'Check Status' > 'Mega CC Road Works Progress' या लिंकवर माहिती पाहू शकतात. तसेच, डॅशबोर्डवर विशिष्ट रस्त्याचे नाव टाकून किंवा 'मॅप'वर क्लिक करूनही माहिती मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रत्येक मुंबईकराला 'खड्डेमुक्त मुंबई' या स्वप्नातील वाटचालीची माहिती थेट मिळू शकणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com