देवा राखुंडे, बारामती
Pune News: दौंड तालुक्यातील खडकी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेलच्या चालकांसह दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खडकी परिसरात असलेल्या आनंद हॉटेल, लॉजिंग अँड बारवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. हॉटेलच्या आडून बेकायदेशीरपणे देहव्यापार चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद हॉटेलमध्ये काही महिलांकडून आर्थिक फायद्यासाठी बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. दौंड पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
(नक्की वाचा- HSRP नंबर प्लेटची मुदत संपली; आता होणार थेट कारवाई, किती दंड बसू शकतो?)
सहा महिलांची सुटका
छाप्यात 6 महिलांची या अनैतिक व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी विश्वनाथ राजू शेट्टी आणि मनोज मोहिते या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर 'स्त्रिया व मुलींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956' (PITA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Dhule Crime: लाठ्याकाठ्या तलवारीने हल्ला, गोळीबार... शीख बांधवांमध्ये तुफान राडा, धुळ्यात खळबळ)
वेश्याव्यवसायाचं रॅकेट
ही कारवाई दौंड पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या पार पाडली. या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. वेश्याव्यवसायासाठी या महिलांना कुठून आणले होते आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हॉटेल मालकावर आणि मॅनेजरवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.